महायज्ञात संभाजीराजेंची आहुती जाते की काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:40 AM2019-06-04T00:40:37+5:302019-06-04T00:40:42+5:30
कोल्हापूर : मराठ्यांच्या इतिहासाचा वापर करून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री थापाडे आहेत. रायगडाचा चुकीचा इतिहास ते जनतेसमोर मांडत आहेत. रायगड ...
कोल्हापूर : मराठ्यांच्या इतिहासाचा वापर करून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री थापाडे आहेत. रायगडाचा चुकीचा इतिहास ते जनतेसमोर मांडत आहेत. रायगड संवर्धनाच्या त्यांच्या महायज्ञात आमचे मार्गदर्शक संभाजीराजे यांचीच आहुती जाते की काय, याची आम्हाला भीती आहे, अशा शब्दांत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार संभाजीराजे यांनी रविवारी रायगड किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली होती व स्वराजाच्या राजधानीचा महायज्ञ सुरु झाल्याचे जाहीर केले होते. त्यास सावंत यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले. शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ते बोलत होते.
ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी रायगडाची पाहणी केलेल्या मुख्यमंत्र्यांनी गडावर ३०० वाडे नव्याने सापडल्याचे सांगितले आहे. हे ३०० वाडे कुठे आहेत हे त्यांनीच दाखवावे. वास्तविक तेथे शिवाजी महाराजांचा आणि अष्टप्रधान मंडळाचे वाडे असे एकूण २५ ते ३० वाडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी रायगडाच्या संवर्धन व विकासासाठी ६०० कोटींच्या निधीची घोषणा केली आहे; पण आता सत्तेची पाच वर्षे संपत आली तरी सात कोटींचासुद्धा निधी मिळालेला नाही.
ते म्हणाले, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली, समुद्रात जाऊन जलपूजन करण्यात आले, पाच वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करू, असे सांगण्यात आले होते. आता पाच वर्षे संपत आली तरी पुतळा उभारण्यासाठीची मंजुरी मिळालेली नाही. रायगड संवर्धनाचा महायज्ञ सुरू केल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत; पण त्या महायज्ञात संभाजीराजेंची आहुती जाते की काय, अशी भीती आहे.