बँकांमधील गर्दीचे करायचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:55+5:302021-05-05T04:37:55+5:30
रमेश पाटील कोल्हापूर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणची गर्दी आटोक्यात येत असतानाच बँकांमधील गर्दी मात्र ओसरत नसल्याचे ...
रमेश पाटील
कोल्हापूर :
कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणची गर्दी आटोक्यात येत असतानाच बँकांमधील गर्दी मात्र ओसरत नसल्याचे चित्र आहे. पेन्शन, पगार, ठेवीवरचे मासिक व्याज आणि शासकीय अनुदानाची जमा झालेली रक्कम काढण्यासाठी ही गर्दी होत असली तरी बँकांतील ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारीच ठरत आहे.
प्रत्येक बँकेच्या शाखेत पेन्शनरांची खाती मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक महिन्याच्या १ ते ७ तारखेपर्यंत पेन्शनरांची गर्दी बँकांत मोठ्या प्रमाणात होते. वास्तविक बँकांच्या रांगेत पेन्शनरांना बराच वेळ उभा राहता लागू नये म्हणून एटीएम कार्ड देणे गरजेचे होते; परंतु पेन्शनरांना एटीएम कार्ड देऊ नये, अशा सूचना ट्रेझरीकडून बँकांना प्राप्त झाल्याने बहुतेक सर्वच पेन्शनर स्वतः बँकेत घेऊन विड्रॉलने पेन्शन काढतात. त्यामुळेही काही प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक नोकरदारांचे पगार बँकांच्या खात्यावर जमा होतात. यातील काहीजण स्वतः बँकेतून पैसे विड्रॉल करतात. सेवानिवृत्त लोकांनी सेवानिवृत्ती नंतर आलेली रक्कम बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर आपली गुजराण सुरू ठेवली आहे. ते प्रत्येक महिन्याला ठेवीचे व्याज घेण्यासाठी बँकांत येत असतात. याशिवाय काही शासकीय योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होते, असे अनुदान काढण्यासाठीही बँकात लोकांचा वावर राहतो. मात्र, बँकांमध्ये होणारी गर्दी कशी आवरायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, ऑनलाइन व्यवहार केल्यास अशा गर्दीला पायबंद घालता येणे शक्य होणार आहे.
चौकट :
बँकेत येण्याची कारणे...
-पगार, पेन्शन, अनुदान काढण्यासाठी, धनादेश भरण्यासाठी, ठेवी ठेवण्यासाठी, पासबुक भरण्यासाठी, सध्या बँकेत फक्त पैसे देवाण-घेवाणीचे व्यवहार सुरू आहेत. हे माहीत असूनही काहीजण कर्जाची चौकशी करण्यासाठी बँकांत येतात. अशा एक ना अनेक कारणांनी बँकांत गर्दी होत आहे. बहुतेक बँकांत आत प्रवेश करताना दरवाजावर गर्दी दिसते. मात्र, आत बँकेत गेल्यावर बहुतेक बँकांनी सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पालन केले असल्याचे चित्र आहे
.
चौकट: महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गर्दी ...
प्रत्येक महिन्याला एक ते दहा तारखेपर्यंत पेन्शन, ठेवीवरचे व्याज, पगार जमा होतो. त्यामुळी ही रक्कम काढण्यासाठी पहिल्या आठवड्यात बँकांमध्ये गर्दी होत आहे. या गर्दीला बँका काहीही करू शकत नाहीत. मास्क पाहून प्रवेश देणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, ग्राहकांचे सॅनिटायझर करणे या गोष्टी मात्र बँका काटेकोरपणे पाळत असल्याचे बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट: पेन्शनरांना एटीएम कार्ड द्यायला हवे...
सध्या बँका काही प्रमाणात गर्दी होते ही वस्तुस्थिती आहे. कॅश देवघेवची वेळ थोडीशी कमी केल्याने तसेच महिन्याची सुरुवात असल्याने पेन्शनर तसेच पगार जमा झाल्याने पगार काढण्यासाठी लोक बँकेत गर्दी करत आहेत. पेन्शनरांना एटीएम कार्ड देण्यास ट्रेझरीचा विरोध आहे काळजी घेऊन ग्राहकांना सेवा दिली जात असल्याचे स्टेट बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट : आमचा छोटा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त आम्हाला ग्राहकांकडून काहीवेळेला चेक दिले जातात. धनादेश भरण्यासाठी आम्हाला बँकांत अजून -मधून यावे लागते.
प्रदीप प्रताप झांबरे
मुडशिंगी,कोल्हापूर.
कोट : बँकेतील ठेवीच्या व्याजावर आमचा औषधोपचार व उदरनिर्वाह चालतो. त्यासाठी न चुकता प्रत्येक महिन्याच्या एक किंवा दोन तारखेला आम्हाला बँकेत येऊन पैसे काढावे लागतात.
छाया जनार्दन साळोखे,
कसबा बावडा.
कोट : बँकेच्या खात्यावर पगार जमा होतो. एटीएममधून मोठी रक्कम काढता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊनच आम्ही पगार काढतो. त्यासाठी बँकेत यावेच लागते.
सुनील विठ्ठल साळोखे
जवाहरनगर,कोल्हापूर.
कॅप्शन : ०३ बँक गर्दी
१) बँक ऑफ इंडियाच्या कसबा बावडा शाखेच्या दारात ग्राहकांची गर्दी अशी नेहमीच असते. मात्र, तरीही सिक्युरिटी गार्ड ग्राहकाचे मास्क बघून व त्याच्या हातावर सॅनिटायझर टाकून एकेकाला आत सोडतात. (फोटो :रमेश पाटील )
२) स्टेट बँकेच्या दसरा चौक शाखेत प्रवेश करण्यासाठी ग्राहकांनी अशी गर्दी केली होती. ही बाहेर दिसणारी गर्दी प्रत्यक्षात बँकेच्या आतमध्ये कुठेही दिसत नव्हती. बँकेने आत गर्दी होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेतल्याचे दिसून येत होते.
(फोटो:नसीर अत्तार )