माझ्या मुलाने पन्नास वर्षांनी राजकारण करायचे काय?
By admin | Published: February 20, 2017 01:00 AM2017-02-20T01:00:35+5:302017-02-20T01:00:35+5:30
सदाभाऊ खोत : राजू शेट्टी यांच्याबद्दल नेहमीच आदर
वारणानगर : खासदार राजू शेट्टी हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे. भाजपमुळे माझ्यात व खासदार राजू शेट्टी यांच्यात फूट पडेल असे जे बोलतात हे त्यांचे अज्ञान आहे. काळाच्या ओघात आमच्याबद्दलचा तो संभ्रम दूर होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच चळवळीत सक्रिय असलेल्या माझ्या मुलाने अजून पन्नास वर्षांनी निवडणूक लढवायची काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.
वारणानगर येथे रविवारी जनसुराज्यचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वारणानगर येथे दुपारी विनय कोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेत सदाभाऊ यांनी बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेला सुपुत्र सागर खोत यांच्या मागे सांगली जिल्ह्यातील जनसुराज्यची ताकद लावावी, अशी विनंती विनय कोरे यांना केल्याचे कळते. मात्र, तपशीलाबाबत गोपनीयता पाळत खोत यांनी भाजप-स्वाभिमानी-जनसुराज्य सत्तेतील मित्रपक्ष असल्याने कोरे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले.
खोत म्हणाले, खासदार राजू शेट्टी आमचे नेते असून, मी त्यांचा आदर करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची जाण आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून ‘स्वाभिमानी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडत आहे. सरकारही सकारात्मक आहे. त्यामुळे मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेली अनेक वर्षे राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळीचे काम करीत आहे. माझा मुलगा सागर आता सव्वीस वर्षांचा आहे. मी आणखीन वीस-पंचवीस वर्षे राजकारण करीन. त्यानंतर म्हणजे ५० व्या वर्षी माझ्या मुलाने राजकारण करावे काय, असा सवाल त्यांनीकेला.
माझ्यात व खासदार शेट्टी यांच्यात जे काही बोलले जात आहे ते काळाच्या ओघात दूर होईल. यापुढेही संघटनेशी एकनिष्ठ राहून चळवळीसाठी काम करण्याची ग्वाही खोत यांनी दिली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश युवकाध्यक्ष सुमित कदम, विश्वासराव जाधव आदी उपस्थित होते.
भाजप प्रवेशाबद्दल योग्य वेळी बोलेन : खोत
सदाभाऊ खोत हा सुज्ञ आहे. तो संघर्षातूनच निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघर्ष हा मला नवीन नाही. सध्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी बोलू, असे सदाभाऊ खोत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सांगली जिल्ह्यातील ठिकठिकाणी मतदारसंघात भाजपसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप, स्वाभिमानी व मित्रपक्षाला चांगले दिवस आले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक जास्त जागा जिंकून सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजप, स्वाभिमानी, मित्रपक्षाची सत्ता येणार असल्याची ग्वाहीही मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.