Kolhapur-बिद्री कारखाना निवडणूक: गद्दारांना ‘लई भारी’ कारभार कसा दिसेल..?, के.पी.पाटील यांचा सवाल
By राजाराम लोंढे | Published: December 1, 2023 01:41 PM2023-12-01T13:41:50+5:302023-12-01T13:42:19+5:30
टेस्ट ऑडिटला कधीही तयार; पण कारकुनाच्या अहवालावर नाही
बिद्री कारखान्यासाठी गेले पंधरा दिवस दूधगंगा व वेदगंगा नदीकाठावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या निवडणुकीत अनपेक्षितपणे झालेल्या आघाड्या, मातब्बर नेत्यांनी उडवलेली प्रचाराची राळ व दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर होणारी चिखलफेक शांतपणे पाहणारा सभासद, रविवारी (दि. ३) मतदान करणार आहे. या सगळ्या पार्श्वूभमीवर सत्ताधारी आघाडीचे पॅनल प्रमुख के.पी.पाटील यांची भूमिका..
राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘बिद्री’च्या १०७ कोटींच्या सहवीज प्रकल्पात ९६ कोटींचा ढपला पाडल्याचा आरोप विरोधक करीत आहेत; पण तोच प्रकल्प सहा वर्षांत कर्जमुक्त केला. ढपला पाडला असता तर मग याच प्रकल्पाला राज्य व केंद्र सरकारने दोन वेळा सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविले कसे? कारखान्यावर बोलण्यासारखे काहीच नसल्याने बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. ज्यांच्या आशीर्वादाने दहा वर्षे आमदारकी भोगली, त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टांग मारून गुवाहाटीला गेले. ज्यांच्या रक्तातच गद्दारी आहे, अशांना ‘बिद्री’चा ‘लई भारी’ कारभार कसा दिसेल? अशी बोचरी टीका सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीचे नेते, कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
के.पी.पाटील म्हणाले, कारखान्यांच्या विविध विभागांतील उत्पन्न हे मुख्य ताळेबंदाला घेतले जाते. ही पद्धत केवळ ‘बिद्री’ वापरत नाही, तर आरोप करणाऱ्या ‘शाहू’ व ‘हमीदवाडा’ कारखान्यांतही असाच जमा-खर्च केला जातो. टेस्ट ऑडिटला आम्ही कधीच घाबरलो नव्हतो आणि घाबरणारही नाही. माझ्या कारभारावर सभासदांचा पूर्ण विश्वास आहे. या मंडळींनी साध्या कारकुनाच्या आदेशानुसार टेस्ट ऑडिटची मागणी केली. माझे तर स्पष्ट मत आहे, श्रेणी-१ च्या अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, मग खुशाल ऑडिट करा. सर्वच कारखाने ऊस वाहतूक संस्थांना कोट्यवधींचे ॲडव्हान्स देतात. तशाच प्रकारे मालोजीराजे संस्थेला कारखान्याने दिले. त्याने फसवले, त्याच्यावर सध्या दावा सुरू असून, त्यातील काही रक्कमही वसूल झाली आहे. या संस्थेकडील पै अन् पै वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
कारखानदारीला आर्थिक शिस्त लागावी म्हणून साखर आयुक्तांनी सर्वच कारखान्यांना कंत्राटी भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही कर्मचारी घेतो, त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना कायम करतो. कायम कर्मचाऱ्यांंना द्याव्या लागणाऱ्या सोयीसुविधांचे पैसे वाचले, हे प्रशासक काळातही केले जात होते. कारखान्याच्या कारभारावर बोलण्यासारखे काहीच नसल्याने दुसऱ्या मुद्यावर बोलून सभासदांना आपल्याकडे खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. कारखान्यात भ्रष्टाचारच झाला तर दहा वर्षे तुम्ही आमदार आहात, सरकार तुमचे होते मग बाहेर का काढला नाही? कारखाना हिताच्या प्रत्येक गोष्टीत अडवणूक करून नुकसान करणाऱ्यांना सभासद कायमचे घरी बसवतील.
‘बिद्री’त एकाधिकारशाही नव्हे, खरी लोकशाही
माझ्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करणाऱ्यांच्या कारखान्यांत काय आहे? तेथील सभासदांना माहिती आहे. ‘बिद्री’मध्ये सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन वीस वर्षे कारखाना मजबूतपणे चालविला. संचालकांना विश्वासात घेऊन धोरण आखले आणि त्यानुसारच अंमलबजावणी केली. त्यामुळे टीका करणाऱ्यांच्या कारखान्यातच एकाधिकारशाही असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
मग, ‘दुधसाखर’मध्ये प्रवेशासाठी रांगा कशा?
माझ्या नेतृत्वाखालील सर्व संस्था आदर्शवतच चालवल्या जातात. मुदाळ येथील माझ्या संस्थेवर आरोप करणाऱ्यांनी स्वत:चे कर्तृत्व पाहावे. कारखान्याच्या दुधसाखर महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते आहेत. महाविद्यालयाला अवकळा आली तर प्रवेशासाठी रांगा कशा? विज्ञान विभाग शिवाजी विद्यापीठात सर्वोत्कृष्ट कसा? ज्युनिअर कॉलेजमध्ये ७०० विद्यार्थ्यांनी प्रवेश कसा घेतला? हे प्राध्यापक व स्वत:ला प्राचार्य समजणाऱ्यांनी समजून घ्यावे. स्वत:ची कपिलेश्वरची शाळा बंद असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांनी आमची मापे काढू नयेत, असा टोला के.पी.पाटील यांनी लगावला.
‘ए. वाय.’ भ्रमिष्ट; त्यांना काय दिले हे जनतेला माहिती?
ए.वाय.पाटील हे माझे दाजी आहेत, त्यांच्यावर मी आता काही बोलणार नाही. ते भ्रमिष्टासारखे काहीही बोलत आहेत, त्यांचा निकालानंतर पंचनामा करू. त्यांनी मी काय दिले, कसे मोठे केले, हे राधानगरीच्या जनतेला माहिती असल्याचे के.पी.पाटील यांनी सांगितले.
‘शाहू’, ‘हमीदवाड्या’त इथेनॉलचे उत्पन्न तोट्याला वर्ग
‘बिद्री’च्या कारभाराची मापे काढणाऱ्या नेत्यांच्या ‘शाहू’ व ‘हमीदवाडा’ कारखान्यात इथेनॉल व सहवीज प्रकल्पातून मिळालेले अनुक्रमे ९८ कोटी व ६२ कोटी हे कारखान्यांच्या तोट्याला वर्ग केले आहेत. ‘हमीदवाड्याचा कारभार जाहीरपणे सांगायला लागलो तर तोंड दाखविणे अवघड होईल, असा टोला के.पी.पाटील यांनी लगावला.
आमचं काम बोलतयं..
- देशातील अव्वल ३० मेगावॉट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभा
- गाळप क्षमता ४५०० टनांवरून ७५०० टनांपर्यंत
- उच्चांकी दराची परंपरा कायम
- ऊस तोडणी बिले, कामगार पगार, बोनस, १२ टक्के पगारवाढ देणारा राज्यातील पहिला कारखाना
- कारखान्याची स्थावर मालमत्ता ५४ कोटींवरून ५२७ कोटी
- ६० केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प चालू गळीत हंगामात सुरू करणार
पाच वर्षांत हे करणार..
- ऊसउत्पादकांना उच्चांकी दर
- कारखान्यांशी निगडित उपपदार्थनिर्मिती प्रकल्पासह नवनवीन प्रकल्पांना प्राधान्य
- शेतकऱ्यांचे एकरी ऊसउत्पादन वाढीसाठी नवतंत्रज्ञान आणणार
- ‘बिद्री’ देशात ‘नंबर वन’ करणार