मला काय होतंय ही वृत्ती जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:25+5:302021-04-20T04:24:25+5:30
पुण्यामुंबईसह बाहेरून येणाऱ्या नातेवाईकांना थेट घरात राहण्यासाठी घेणे धोकादायक आहे. अनेकांची घरे लहान असतात. एकत्रित कुटुंबे असतात. त्यांनी तर ...
पुण्यामुंबईसह बाहेरून येणाऱ्या नातेवाईकांना थेट घरात राहण्यासाठी घेणे धोकादायक आहे. अनेकांची घरे लहान असतात. एकत्रित कुटुंबे असतात. त्यांनी तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घर स्वच्छ ठेवले पाहिजे. वारंवार ज्यांना बाहेर जाण्यावाचून गत्यंतर नसेल अशांनी घरातील ज्येष्ठ, आजारी व्यक्ती, लहान मुले यांच्यापासून लांब रहावे. घरातही मास्क वापरला पाहिजे. अनेकजण एक मास्क काळाकुट्ट् होईपर्यंत वापरतात. तसे न करता तो प्रत्येक दिवशी बदलून धुतला पाहिजे.
रोजच्या जेवणात अंडी, मिळतील ती फळे, भाजीपाला याचा वापर केला पाहिजे. पातळ पदार्थ घेतले पाहिजेत. ताक, आंबील घेतली, लिंबू सरबत घेतले तरी चालेल. शक्य तितका व्यायाम केला पाहिजे. वाफ घेणे, गरम पाणी पिणे या काही गोष्टी सहज शक्य आहेत त्या केल्या पाहिजेत. मुळात या काळात कोणताही घरगुती, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करू नये किंवा असे कोणी आयोजन केले असेल तर जाऊही नये.
रोज सकाळी आणि संध्याकाळी किमान दहा मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. चालताना जर श्वास घेणे जड जाऊ लागले तर आपल्या तब्येतीचा काही तरी प्रश्न आहे असे ओळखावे आणि गावातील डॉक्टर, आरोग्य उपकेंद्राशी संपर्क साधावा. एखादा नागरिक पॉझिटिव्ह आला म्हणजे फार मोठे काही होत नाही. परंतु काळजी घेण्याचे प्रमाण वाढवावे लागते. घरात जर त्याच्यासाठी स्वतंत्र खोली, जोडूनच शौचालय नसेल तर मग ग्रामसमिती किंवा डॉक्टरांशी बोलून रुग्णालयात किंवा जेथे घरापासून दूर स्वतंत्र राहता येईल अशा ठिकाणी रहावे. या दरम्यान दिलेली औषधे, ताकद देणारे जेवण आणि ‘मी यातून ठणठणीत होणार’ ही भावना मनात ठेवली तर रुग्ण आठ, दहा दिवसांत बरा होतोच. ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा अन्य व्याधी असतात त्यांच्यासाठी जरा जास्त जोखीम असते. या रुग्णांनी दिवसभरात प्रत्येक वेळी अर्धा तास असे पाच, सहा वेळा पालथे झोपावे. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन जादा घेतला जातो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. कोरोना होऊ नये यासाठी दक्षता घेणे आपल्या हातात आहे. ती घेऊनही जर झालाच तर त्याला तितक्याच समर्थपणे सामोरे जा..
१९०४२०२१ कोल डॉ. योगेश साळे
(लेखक काेल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत)