'हातकणंगलेच्या खासदारांनी आतापर्यंत काय केले? लोक त्यांना बदला म्हणतात' धैर्यशील मानेंचे नाव न घेता प्रकाश आवाडेंची टीका
By विश्वास पाटील | Published: February 14, 2024 07:02 AM2024-02-14T07:02:05+5:302024-02-14T07:06:21+5:30
Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी कर्तृत्वानच आहेत. जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे; पण इथे खासदार कोण आहे? तो आपल्याला काय देणार? आतापर्यंत त्याने काय दिले, याची उत्तरे लोक मागणार आहेत. लोक हळूच या खासदाराला बदला म्हणून सांगत आहेत, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली.
- विश्वास पाटील
इचलकरंजी - पंतप्रधान मोदी कर्तृत्वानच आहेत. जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे; पण इथे खासदार कोण आहे? तो आपल्याला काय देणार? आतापर्यंत त्याने काय दिले, याची उत्तरे लोक मागणार आहेत. भाजपच्या जनसंपर्क अभियानातून घरोघरी चाललेल्या कार्यकर्त्यांना विचारा. लोक हळूच या खासदाराला बदला म्हणून सांगत आहेत, अशी गंभीर टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली.
भाजपमध्ये आम्हाला चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करतयं, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचाही नाव न घेता चिमटा काढला. शिरदवाड (ता.शिरोळ) येथील रस्ते कामाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर होते.
आमदार आवाडे म्हणाले, देशात तिसºयांदा मोदी हेच पंतप्रधान होणार, त्यांना पर्याय नाही. ते सत्तेत आल्यापासून सर्वांचा निधी थेट खात्यात येतो. हर घर जल, धान्य, रस्ते निधी असे सगळे भरभरून मिळत आहेत. आर्थिक क्रांती झाली. जगात यशस्वी भारत म्हणून वाटचाल सुरू आहे. जगात भारी अशी चर्चा असलेले ते पंतप्रधान आहेत. परंतु इथे खासदार कोण? त्याने या भागाला आतापर्यंत काय दिले, याची उत्तरे लोक मागत आहेत. त्याला बदला म्हणून सांगत आहेत. याबाबत तुमचे आणि आमचे वरिष्ठ नेते काय तो निर्णय घेतील. आम्ही काय कुणाला बदला म्हणत नाही. वरिष्ठ जो निर्णय देतील, त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहे.
आम्ही अजून थेट त्यात नाही. काहीजण आम्हाला चार हात लांब ठेवून राजकारण करीत आहेत. भाजपचं आम्हाला न बोलता सगळे कार्यक्रम सुरूच आहेत. हे कोण करतयं, हे सगळ्यांना माहित आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या संपूर्ण भाषणात त्यांनी वेळोवेळी यड्रावकरांना तसेच मंचावर उपस्थित भाजपचे अन्य पदाधिकारी यांची नावे घेत केल्याने याची जोरदार चर्चा रंगली.
आम्हाला दोन मंत्र्यांचा त्रास झाला
यड्रावकर साहेब तुम्ही सत्तेत होता, मंत्री होता. परंतु तुमचा आम्हाला कधीच त्रास झाला नाही. मात्र, जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचा आम्हाला खूपच त्रास झाला. त्यातील एक मंत्री मुश्रीफ आता आमच्यात सामील झाले. त्यामुळे त्यांचा त्रास आता कमी झाला आहे. सतेज पाटील यांचे नाव न घेता आवाडेंनी त्यांच्यावर आरोप केला.
मुलासाठी फिल्डिंग
चार दिवसांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामध्ये आमदार आवाडे हे महायुतीचे खासदार आणि संभाव्य उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर टीका करून आपले पुत्र राहुल यांच्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचीही चर्चा सुरु आहे.