धावत्या रेल्वेमध्ये अचानक छातीत दुखू लागले तर.? करा 'या' टोलफ्री क्रमांकावर संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 04:32 PM2021-12-20T16:32:39+5:302021-12-20T16:40:29+5:30
एखाद्या प्रवेशाच्या छाती दुखण्याचा अथवा अन्य काही आजाराचा त्रास उद्भवल्यास त्यांना प्राथमिक स्वरूपातील वैद्यकीय सेवा रेल्वेकडून उपलब्ध करून दिली जाते.
कोल्हापूर : रेल्वेतून जाताना अचानकपणे छातीत दुखू लागले अथवा इतर काही वेदना झाल्या, तर प्रवासी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांनी याबाबत रेल्वेतील तिकीट पर्यवेक्षक (टीसी), रेल्वे पोलिसांना माहिती देताच अथवा १०९ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास पुढील स्थानकावर वैद्यकीय पथक दाखल होऊन त्यांना सेवा पुरविते.
काही वृद्ध, आजारी नागरिक रेल्वेतून प्रवास करताना अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली. एखाद्या प्रवेशाच्या छाती दुखण्याचा अथवा अन्य काही आजाराचा त्रास उद्भवल्यास त्यांना प्राथमिक स्वरूपातील वैद्यकीय सेवा रेल्वेकडून उपलब्ध करून दिली जाते. कोल्हापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व लहान-मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रथमोपचाराचे साहित्य उपलब्ध आहे. मिरज, सातारा, पुणे या स्थानकांवर डॉक्टर, वैद्यकीय पथकाची सुविधा कार्यन्वित आहे.
अचानक वैद्यकीय गरज लागली, तर काय कराल?
- प्रवाशांना अचानकपणे वैद्यकीय गरज लागू शकते. त्याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने केंद्र सरकारच्या मदतीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी १०९ असा टोलफ्री क्रमांक आहे.
- वैद्यकीय सेवेची गरज लागल्यास प्रवाशांनी या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधवा अथवा टीसी, रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी. त्यानंतर पुढील स्थानकावर वैद्यकीय पथक येते.
- ही सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारी असल्याचे पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी रविवारी सांगितले.
कोणत्याही प्रवाशाला वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास ती रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करून दिली जाते. मात्र, त्यासाठी संबंधित प्रवासी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी सर्वप्रथम त्याची माहिती टीसींना द्यावी. ते शक्य नसल्यास १०९ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. अत्यंत आप्तकालीन स्थिती असल्यास रेल्वे थांबवून स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी वैद्यकीय सुविधा पुरविली जाते. -विजयकुमार, प्रबंधक, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी)
कोल्हापूर - तिरुपती
कोल्हापूर - दिल्ली
कोल्हापूर - नागपूर (व्हाया पंढरपूर)
कोल्हापूर - अहमदाबाद
कोल्हापूर - नागपूर (महाराष्ट्र)
कोल्हापूर - धनबाद
कोल्हापूर - मुंबई (कोयना)