‘उत्तर’मध्ये इंजिनिअरिंगची मुले कसला फॉर्म भरताहेत?, प्रलोभनाचा प्रयत्न हाणून पाडू; चंद्रकांत पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:47 AM2022-04-02T11:47:21+5:302022-04-02T11:48:28+5:30
जाणीव न ठेवणाऱ्यांची राज्यातील नेत्यांची यादी काढली तर बंटी पाटील हे त्यांतील पहिल्या क्रमांकाचे नेते ठरतील.
कोल्हापूर : ‘उत्तर’ मतदारसंघात एका इंजिनिअरिंग कॉलेजची मुले फॉर्म घेऊन फिरत आहेत. मतदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि अकाऊंट नंबर घेतला जात आहे. हे काम केले तर अंतर्गत गुण वाढवून देताे असे आश्वासन देण्यात आले आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी नांदेडमध्ये अशाच फॉर्ममधील माहितीच्या आधारे मतदारांना पेटीएममधून पैसे पाठवण्यात आले होते. असा येथे होणारा प्रकार हाणून पाडू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
निवडणूक आयोगानेही या प्रकाराची चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.
राज्यातील घडामाेडींबाबत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीवाले तुमच्या ‘मातोश्री’वरही सीसीटीव्ही कॅमेरे लावतील. तेव्हा गृहखाते स्वत:कडे ठेवा, अशी सूचना मी उद्धव ठाकरे यांना आधीच केली होती. दिलीप वळसे-पाटील हे व्यक्ती म्हणून सभ्य आहेत; परंतु गृहमंत्री म्हणून ते लेचेपेचे आहेत. काही भानगडच नसेल तर भाजपच्या नेत्यांवर वळसे-पाटील तरी काय कारवाई करणार, असाही सवाल पाटील यांनी केला.
ते पुढे म्हणाले, स्वार्थासाठी कोणासोबतही जाण्याचा राष्ट्रवादीचा इतिहास आहे. पुणे, सांगलीसह अन्य बँकांची माहिती प्रवीण दरेकर यांच्याकडे आहे. त्यांचे काम सुरू आहे. दुसरीकडे, किरीट सोमय्या हेदेखील पुणे, दिल्ली फेऱ्या मारत आहेत. या सगळ्यांचा परिणाम लवकरच दिसेल.
जाणीव न ठेवणाऱ्यांत बंटी पाटील पहिले
जाणीव न ठेवणाऱ्यांची राज्यातील नेत्यांची यादी काढली तर बंटी पाटील हे त्यांतील पहिल्या क्रमांकाचे नेते ठरतील, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.