"मी कसलेला पैलवान, माझ्या नादाला लागू नये", सतेज पाटलांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:56 PM2024-04-23T16:56:14+5:302024-04-23T16:57:26+5:30
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एका कार्यक्रमातील सभेतून महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे
Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच उमेदवारांनी विजयासाठी जीवाचं रान केलं आहे. कोल्हापूर लोकसभेची चर्चाही जोरदार सुरू आहे. येथील लढत ही चुरशीची होणार असून आरोप-प्रत्यारोपामुळे कोल्हापुरातील वातावरण तापले आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहे.
दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु केला आहे. यातच महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एका कार्यक्रमातील सभेतून महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. "मी सुद्धा २५ वर्ष इथं कसलेला पैलवान आहे. कोणाला कधी चितपट करायचं, हे मला माहीत आहे. येथील कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनो माझ्या नादाला लागू नये, अशा शब्दात सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधताना सतेज पाटील म्हणाले, "तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही. पण आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला तर बंटी पाटलांसोबत गाठ आहे, हे लक्षात ठेवा. तु्म्ही ज्यांच्यासाठी काम करत आहात, ते निवडणुकीनंतर तुमचा फोन सुद्धा उचलणार नाहीत. त्यानंतर मात्र मीच आहे, हे ध्यानात ठेवा. निवडणुकीपर्यंत सतर्क राहा. काही अडचण आली, तर बंटी पाटील रात्री बारा वाजता काठी घेऊन उभा आहे."
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख बड्या नेत्यांनी प्रचारासाठी यंत्रणा सतर्क केली असून मोठ्या सभांचा फड कुठे ना कुठे रोज भरताना दिसून येत आहे. तर काही ठिकाणी प्रचारासाठी आणि उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील, यासंदर्भात रणनीती ठरवली जात आहे.