फडणवीस सरकारने काय दिवे लावले माहीत आहेत;चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 07:42 PM2020-07-03T19:42:06+5:302020-07-04T12:23:27+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.
कोल्हापूर : सत्तेवर असताना फडणवीस सरकारने काय दिवे लावलेत माहीत आहेत, असा टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी लगावला. राज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसांत सोडवला असता, असे वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.
कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. सारथीसाठी ५० कोटींचा निधी दिला असताना ५०० कोटींचा निधी दिल्यासारखे विरोधक वागत आहेत. कोकणातील चक्रीवादळाचा पंचनामा नाही, मदत नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्याचाही समाचार त्यांनी यावेळी घेतला.
मंत्री वडेट्टीवार म्हणाले, सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) सुरू झाल्यानंतर सत्ता बदलली. मागील सरकारने केवळ ५० कोटींचा निधी दिला. आमची सत्ता आल्यानंतर आम्हीही ५० कोटी दिले.
अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपयांची तरतूद केली आणि आम्ही ती दिली नाही, असे झाले नाही. मात्र विरोधक नको त्या टीका करीत आहेत. आम्ही कुठेही कमी पडत नाही. कोरोनाच्या संकटात विरोधकांनी समजून घ्यावे.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली
राज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसांत सोडवण्यात आला असता, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. याबाबत आपले काय मत आहे, असे विचारल्यानंतर वडेट्टीवार म्हणाले, दोन दिवसांचा कालावधीही त्यांना जास्त होईल, असे मला वाटते. ते दोन मिनिटांतच तो सोडवतील, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.