पैसे मागणाऱ्यांची नैतिकता काय?
By admin | Published: April 29, 2015 01:00 AM2015-04-29T01:00:14+5:302015-04-29T01:03:19+5:30
संजय पाटील : महालक्ष्मी विकास आघाडीच्या प्रचारसभेत विचारणा; प्रचारफलकाचे उद्घाटन
कोल्हापूर : पॅनेलमध्ये उमेदवारी देण्यासाठी थेट पैसे मागणाऱ्या सुकाणू समिती व कारभारी मंडळींना मते मागण्याची नैतिकता नाही. जे सत्तारूढ म्हणत आहेत, त्यांना सहा तालुक्यांत उमेदवार मिळाले नाहीत, अशांना बाजूला करा, असे आवाहन सेवा मिनिट्रियलमधील उमेदवार संजय पाटील यांनी केले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीसाठी महालक्ष्मी विकास आघाडीच्या प्रचारार्थ हातकणंगले, शिरोळ, कागल व पन्हाळा तालुक्यातील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साताप्पा मोहिते होते.
हुकूमशाही प्रवृत्तीने कारभार करताना प्रत्येक वेळेला सभासदांचा अपमान करणाऱ्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, असा टोला हाणत साताप्पा मोहिते म्हणाले, सर्व समावेशक चेहरे घेऊन आम्ही सभासदांसमोर गेलो आहे, प्रत्येक गोष्टीत मुस्कटदाबी करणाऱ्या कारभाऱ्यांचा खरा चेहरा समोर आल्याने विरोधकांचा तोल सुटला आहे. शपथ ही निष्ठावान माणसे सभासदांसमोर जाहीर सभेत घेतात, आजवर सभासद हिताची कोणती शपथ घेतली ते स्वयंघोषित कारभारी मंडळींनी जाहीर करावी, यासाठी एका व्यासपीठावर यावे.
आर. बी. पाटील म्हणाले, उमेदवारी देताना सुकाणू समितीने स्वयंघोषित नेत्यांशी चर्चा केली पण सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. बिनविरोध निवडणूकच करायची असेल तर अंतिम क्षणाला अर्ज माघारी का दिले, याचा खुलासा करावा. जर चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना स्वत: बिनविरोध असेल तर इतर संघटनांचे उमेदवार बिनविरोध का करता आले नाहीत, याचे आत्मचिंतन नेत्यांनी करावे.
आरोग्य संघटनेचे विभागीय सचिव मेहबूब शेख म्हणाले, निवडणूक बिनविरोधच करायची होती, तर सर्व सभासदांना बोलावून तसा प्रस्ताव का ठेवला नाही, केवळ आपल्याच काखेतील माणसांना बिनविरोधाचा प्रयत्न होता, अशा प्रवृत्तीला सभासद जागा दाखवतील.
शिक्षक नेते एस. व्ही. पाटील म्हणाले, सामान्य सभासदाने प्रतिनिधीत्व करण्यासाठी संधी मागितली तर त्याची मुस्कटदाबी करायची ही सत्ताधाऱ्यांची जुनी पद्धत आहे. प्रत्येकाला स्वत:चे आचार-विचार मांडण्याचा अधिकार आहे. या हक्कांवर कोणी गंडांतर आणत असेल तर त्यांना बाजूला करण्याची क्षमता सभासदांमध्ये आहे.
सुभाष इंदुलकर, प्रसाद पाटील, लक्ष्मी पाटील, दीपक साठे, सचिन जाधव, मनिषा सूर्यवंशी, संध्या कांदणे, अर्चना खाडे, राहुल रेपे, भिवाजी काटकर, पांडुरंग बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. महेश देवमोरे, अभिजित बंडगर, संजीव माने, सुबराव पवार, बी. के. मंगल, ए. जी. पाटील, अशोक मुसळे, दिलीप काळे, सुधीर कुंभार, प्राची बोटे, संगीता गुरव, मंगल पाटील, प्रतिमा पाटील, सुरेखा खटावकर, डॉ. सुनील काटकर, रघुनाथ खोत उपस्थित होते.