दूध रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?, चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टींना सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 06:17 PM2018-07-07T18:17:07+5:302018-07-07T18:31:43+5:30
‘दूधपुरवठा रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?’ असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांना केला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोल्हापूर : ‘दूधपुरवठा रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?’ असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांना केला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
पन्हाळागड ते पावनखिंड मोहिमेचा प्रारंभ शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी १६ जुलैपासून ‘दूध संकलन बंद’ आंदोलन पुकारले आहे.
मुंबईकडे दूधवाहतूक करणाऱ्या सर्व मार्गांची नाकेबंदी करण्याची घोषणा शेट्टी यांनी केली आहे. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता, मुंबईचे दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे काय? दूध रोखणे, भाजीपाला फेकणे ही शेतकरी आंदोलनाची पद्धत नाही.
शेतकऱ्याच्या घरातील दूध, भाजीपाला रस्त्यांवर फेकण्यापेक्षा स्वत:च्या घरातील दूध, भाजीपाला फेकावा, असा सल्ला देत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असला तरी त्यातून सामान्य माणसाला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूर अधिवेशनाची मुदत वाढविण्याबाबत विधिमंडळ कामकाज समिती पुढील आठवड्यात निर्णय घेईल. नागपुरात जादा पाऊस पडल्याने विधिमंडळ अधिवेशनात व्यत्यय आला. नालेसफाईच्या चौकशीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला असला तरी लोकशाही मार्गाने अशी मागणी करणे रास्त असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.