समजूत काढली तरी मतांचे काय?
By admin | Published: January 31, 2017 11:07 PM2017-01-31T23:07:27+5:302017-01-31T23:07:27+5:30
राष्ट्रवादी ‘कोळिंद्रे’मधून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या संजीवनी गुरव यांचीही समजूत काढण्याचे प्रयत्न
ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा --महाआघाडीतील (ताराराणी) उमेदवारीचा पेच सोडविताना संभाव्य बंडखोरांची समजूत काढण्याची जबाबदारी काही स्थानिक व काही वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे. परिणामी, समजूत काढली जाईल. नेत्यांच्या ‘हो’मध्ये ‘हो’ मिळविण्यास कार्यकर्ते तयार होतील; पण मतदान मिळेलच याची खात्री कोण देणार? हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.
सध्या ‘ताराराणी’कडे इच्छुकांची गर्दी आहे. ही गर्दीच डोकेदुखी ठरत आहे. अनेकजण बघून घेण्याची भाषा करू लागले आहेत. विशेषत: पेरणोली पंचायत समिती गण व कोळिंद्रे जिल्हा परिषद गटातील दुखण्याला तूर्तास तरी औषध दिसत नाही.
पेरणोलीतून सहदेव नेवगे निश्चित समजले जात असताना सुरेश पाटकर, सुरेश पाटील यांचीही नावे पुढे येत आहेत. अशावेळी या चर्चेतून अंकुश पाटील, मुकुंद तानवडे, पांडुरंग लोंढे, श्रीपतराव देसाई, शामराव बोलके, आदींनी शांत राहण्यास प्राधान्य दिले आहे. या शांततेतही सूचक अर्थ आहे, तर अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांच्या भूमिकाही अडचणीच्या ठरणार आहेत.कोळिंद्रे जिल्हा परिषदेकरिता विष्णू केसरकर व रमेश रेडेकर यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. एकाची समजून दुसऱ्याच्या पथ्यावर पडेल, असे दिसत नाही.भाजप, स्वाभिमानी, तसेच नाराजांची समजूत काढली; पण समजूत काढली याचा अर्थ त्यांचे हक्काचे मतदान जमेत धरणे चुकीचेठरू शकते.
राष्ट्रवादी ‘कोळिंद्रे’मधून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या संजीवनी गुरव यांचीही समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंचायत समिती गणातही अनेकांची समजूत काढावी लागणार आहे. समजूत काढण्याच्या नादात सर्वच पक्षांचे मतांचे गणितही चुकू लागले आहे.