प्लास्टिकला पर्याय काय...बेकरी व्यवसायासमोर समस्या; पदार्थ खराब होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:24 PM2018-06-29T12:24:25+5:302018-06-29T12:27:25+5:30
बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेकरी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : बेकरीतील बिस्कीट, खारी, बटर, टोस्ट या वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. त्यावर सध्या बेकरी व्यावसायिकांच्या काही उपाय समोर नसल्याने खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती बेकरी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.
बेकरीतील प्रामुख्याने खारी, चिवडा, खाजे, पेढे या वस्तू पॅकिंगसाठी प्लास्टिक पिशवीचाच वापर केला जातो. एका ठिकाणाहून हा माल दुसऱ्या ठिकाणच्या बेकरीत पोहोचविण्यासाठी किंवा ग्राहकांना हे पदार्थ देण्यासाठी प्लास्टिकचे पॅकिंग उपयुक्त ठरत होते. मात्र, प्लास्टिकला बंदी आल्याने हा माल कसा पाठवयाचा, असा प्रश्न बेकरी विक्रेत्यांसमोर आला आहे.
कागदातून पॅकिंग करून दिल्यास पदार्थ मऊ पडण्याची शक्यता आहे. प्लास्टिक पिशवीत बेकरी पदार्थ खूप दिवस टिकतात. पावसाळी व हिवाळी वातावरणात कागदी पिशवीतील पदार्थ भिजण्याची किंवा मऊ पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पदार्थाच्या दर्जावर परिणाम होणार आहे, असल्याचे बेकरी व्यावसायिकांच्यामधून सांगण्यात येत आहेत. आमचा प्लास्टिक बंदीला विरोध नाही; मात्र यावर शासनानेच काहीतरी उपाय सुचवावा, अशी मागणी बेकरी व्यावसायिकांमधून होत आहे.
किराणा दुकानदारांना दिलासा...
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात काटेकोरपणे सुरू असताना किराणा दुकानांतील अडचणी लक्षात घेतल्या. पाव किलोवरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लास्टिक बंदी शासनाने मागे घेतली आहे. या निर्णयामुळे किराणा व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक परत गोळा करण्याची जबाबदारीही संबंधित दुकानदारांचीच आहे.
पॅकिंगवर उत्पादकाचे नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा, उत्पादकांनी रिसायकलिंगसाठी कलेक्शन सेंटर्स उभारावीत. हे प्लास्टिक रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांचीच राहणार असल्याने त्यांचे काम वाढले आहे.
पर्यावरणांच्या दृष्टिकोनातून प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला आहे. मात्र, बेकरी व्यवसायासाठी प्लास्टिकबाबत काही तरी पर्याय देणे गरजेचे आहे. बेकरी पदार्थ व प्लास्टिक यांचे अतूट नाते आहे. प्लास्टिक विना बेकरीतील पदार्थ ग्राहकांना किंवा अन्य दुकानांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न पडला आहे.
एम. आर. शेख,
अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी मर्या संस्था