तज्ज्ञांना रुग्णाच्या हितासाठी पाचारण करण्यात गैर काय आहे..?
By admin | Published: January 6, 2015 11:08 PM2015-01-06T23:08:53+5:302015-01-07T00:07:38+5:30
आपल्याच स्पेशालिटीचा अहंकार न बाळगता इतर शास्त्रांतील
सिटी टॉक
आरोग्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा अधिकार विशेष करून वैद्यकीय व्यावसायिकांस आहे, ही भूमिका ठेवून ‘लोकमत’ने मला लिहिण्याची संधी दिली असावी. सुमारे २५ वर्षांपूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना रूढ होती. फॅमिली डॉक्टर हा त्या घरचा मायबाप जणू. आरोग्याचे तर सोडाच; पण घरातील मुला-मुलीच्या लग्नाची निश्चिती ही त्याच्या विचाराने व्हायची. त्या घरातील प्रत्येक बाबतीतील नर्स फॅमिली डॉक्टरला माहीत असायची. डॉक्टरला ज्याप्रमाणात विश्वास मिळतो, त्याच्या कितीतरी पट विश्वासाने फॅमिली डॉक्टरला काम करावे लागायचे. त्यामुळे पूर्वीचा रुग्ण आजच्यासारखा गोंधळलेला अवस्थेत नसायचा. शांतपणे अनारोग्य तसेच इतर संकटांवर हसतखेळत मात करायचा. आज वैद्यकीय तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात विकसित होत आहे. स्पेशालिटी तसेच सुपर स्पेशालिटीचा जमाना आहे. वाढती लोकसंख्या, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, लैंगिक समस्यांमुळे तसेच त्यावरील उपचारांमुळे उदा. बाजारात येणाऱ्या नवनवीन प्रतिजैविकेच्या दुष्परिणामांमुळे होणारे किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर सारखे आजार उद्भवतात.
गेल्या पन्नास वर्षांत कॅन्सर, हृदयरोगासारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पटलावर इबोला आजाराचे जीवघेणे तांडव होण्याची शक्यता आहे. या सर्व जुन्या तसेच नवीन रोगांचे निदान होण्यासाठी खर्चिक चाचण्या सामान्य, गरीब रुग्णांच्या कुवतीबाहेरच्या आहेत. आजच्या घडीला स्पेशालिटी, सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल ही काळाची गरज आहे; पण मला असे वाटते की, या सर्व सोयी रुग्णांच्या दृष्टीने दुधारी शस्त्रच आहेत. अतिदक्षता विभाग जरूर हवा; पण आजारातून बाहेर पडू पाहणारा रुग्ण त्या विभागात प्रवेश घेतल्यानंतर जास्त आजारी पडला, असे होता कामा नये. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या नियतकालिकाने अशी टीका केली आहे की, पंचतारांकित रोगचिकित्सा केंद्रात माणूस चालत जातो आणि रुग्ण होऊन बाहेर पडतो. अतिदक्षता विभागामध्ये जर एखाद्या रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाला, तर तेथील तज्ज्ञाने आपल्याच स्पेशालिटीचा अहंकार न बाळगता इतर शास्त्रांतील तज्ज्ञांना रुग्णाच्या हितासाठी पाचारण करण्यात गैर काय आहे..?
माझे एक रुग्ण सुदाम कुरणे यांना तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. येथील हृदयरोग हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर योग्य उपचार झाले. त्यामुळे त्यांना त्वरित आराम मिळाला; पण त्याच्याच दुसरे दिवशी त्यांची किडनी अकार्यक्षम झाली. रुग्णालयाने किडनी तज्ज्ञांना पाचारण करण्याचे ठरविले. तत्पूर्वी रुग्णांच्या चिरंजीवाने होमिओपॅथिक औषध देऊन पाहूया, असे सुचविले. तज्ज्ञाने मान्यता दिल्याने होमिओपॅथिक औषधाने त्याच दिवशी किडनीची कार्यक्षमता सुधारली व रिपोर्ट नॉर्मल आले.
सुमारे महिन्यापूर्वी इचलकरंजीमधील जिभेचा कॅन्सरग्रस्त पती आणि त्यांच्या स्त्री-रोग तज्ज्ञ माझ्याकडे कॅन्सरच्या वेदना शमत नाहीत म्हणून आल्या. त्यांना लवकरच गुण आला, की जो अॅलोपॅथिक वेदनाशामक इंजेक्शनमुळेही आला नाही. तेव्हा अशा असाध्य रोगामध्ये होमिओपॅथी कशी काम करते याची त्यांनी जिज्ञासा व्यक्त केली. याचाच अर्थ डॉक्टरांनासुद्धा आपल्या शास्त्राशिवाय दुसऱ्या शास्त्रांची माहिती नसते. वैद्यकशास्त्राच्या प्रवेशापूर्वीच्या अभ्यासक्रमात विविध वैद्यक उपाययोजनांची ढोबळ माहिती दिली पाहिजे. जेणेकरून वैद्यकतज्ज्ञास आपले शास्त्र ज्या रोगात उपयुक्त नाही, त्यामध्ये इतर उपचार पद्धतीचा फायदा करून रुग्णाला रोगमुक्त करता येईल. प्रत्येकाने आजार होऊ नये यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. आजार वाट्याला आल्यास अंधश्रद्धेने एखाद्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आजाराची माहिती तसेच उपाययोजना जाणून घेणे गरजेचे नसून हक्काचे आहे. डॉक्टर हादेखील माणूस आहे. त्यांच्यापुढील व्यापामुळे त्यांच्या हातूनही अनवधानाने चुका होऊ शकतात. डॉक्टरांनीही सदैव सतर्क राहावे व रुग्णानेही सदैव जागृत राहावे, हा माझा नववर्षाच्या संदेश आहे.
(लेखक कोल्हापुरातील प्रख्यात होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत.)