काय आदर्श घ्यायचा?, ‘कागल’च्या जनतेची माफी मागा; मुश्रीफांच्या 'त्या' वक्तव्यावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 04:10 PM2024-10-14T16:10:58+5:302024-10-14T16:11:28+5:30

दोषी नव्हता तर पळून का गेला?

What role model to take, Apologize to the people of Kagal; Samarjit Ghatge reaction to Mushrif statement | काय आदर्श घ्यायचा?, ‘कागल’च्या जनतेची माफी मागा; मुश्रीफांच्या 'त्या' वक्तव्यावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया

काय आदर्श घ्यायचा?, ‘कागल’च्या जनतेची माफी मागा; मुश्रीफांच्या 'त्या' वक्तव्यावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर : ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वास पुढे आणून पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. अशा कागलचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय वक्तव्य करीत आहेत. त्यांनी या थोर पुरुषांच्या विचारांचा अपमान केल्याचा आरोप ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केला.

गडहिंग्लज येथील कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी ‘समरजीत घाटगे यांच्याबद्दल ‘भिकारी’ हा शब्द वापरला होता. यावर, घाटगे म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पुरोगामी कोल्हापुरातील जनतेने काय आदर्श घ्यायचा? शाहूंच्या कागलची ही बदनामी नव्हे का? यापूर्वी दिवंगत विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक, श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब कुपेकर, आप्पासाहेब नलवडे यांच्यामध्ये टोकाचे मतभेद झाले. पण त्यांनी कधी अशी पातळी सोडली नाही. वारंवार शाहू महाराजांच्या कागलचा अपमान ते करत असून याच राजघराण्याने त्यांना राजकारणात आणले हे ते विसरले का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बदल्यांच्या दलालीचा आरोप हसन मुश्रीफ करत आहेत. पण, उपमुख्यमंत्री फडणवीस ज्यावेळी कोल्हापुरात येतील, त्यावेळी त्यांना जरूर विचारू. निवडणूक अजून जाहीर झालेली नसतानाही मुश्रीफ यांची ही अवस्था झाली आहे. ही निवडणूक हसन मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्यात राहिली नाही तर मुश्रीफ विरुद्ध ‘कागल’ची स्वाभिमानी जनता, अशी लढत होणार असल्याने ही निवडणूक हातून सुटल्याचा अंदाज त्यांना आला आहे.

दोषी नव्हता तर पळून का गेला?

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी शेतकऱ्यांकडून गोळा केलेले ४० कोटी हसन मुश्रीफ यांनी खाल्ल्याचा आरोप आपण केला होता. त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, तुरुंगवास इतर गोष्टी पुढच्या होत्या, मात्र त्या आधीच ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेले. दोषी नव्हता, तर ‘ईडी’चे पथक आल्यानंतर पाठीमागच्या दाराने पळून का गेला? असा सवाल समरजीत घाटगे यांनी केला.

Web Title: What role model to take, Apologize to the people of Kagal; Samarjit Ghatge reaction to Mushrif statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.