Rajya Sabha Election: संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेणार? पुढील हालचालींकडे साऱ्यांचेच लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:57 AM2022-05-19T11:57:45+5:302022-05-19T11:58:52+5:30
कोल्हापूरचेच असलेल्या संभाजीराजेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असताना, शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची कोंडी झाली आहे.
कोल्हापूर : संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट न घेतल्यानेच शिवसेना आक्रमक झाल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले. त्यामुळे संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, संभाजीराजे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्याचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले. त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा होती; परंतु त्याला दुजोरा मिळालेला नाही.
संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु त्यानंतर राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेणे आवश्यक होते. एकीकडे शरद पवार हे संभाजीराजे यांच्याविषयी सकारात्मक बोलत असताना, त्यांनी पवार यांचीही भेट घेतली नाही. तसेच ठाकरे यांचीही भेट घेतली नाही.
परिणामी शिवसेना आक्रमक झाली असून, परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली. तर संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी व्टिट करत कोणीही आकडेमोड केली तरी ती महाविकास आघाडीच्या बाजूने असेल. दुसरा उमेदवार उभा करणार, असे स्पष्ट केले. त्यामुळे संभाजीराजे यांना तो धक्का मानला जातो.
संभाजीराजेंना पक्षीय बंधन नको
ज्या भाजपने संभाजीराजे यांना राज्यसभेची राष्ट्रपती कोटयातून खासदारकी दिली, त्या भाजपसाठी त्यांनी काहीच केले नाही, अशी भाजपमधूनच जोरदार तक्रार आहे. परंतु एकूणच संभाजीराजे हे आपल्या राजघराण्याच्या माध्यमातून पक्षीय बंधनात न अडकता स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याच्या भूमिकेत आहेत. तर शिवसेना आता त्यांना पक्षात येण्यासाठीचे बंधन घालण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटणार, याकडे संभाजीराजे समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.
संभाजीराजेंचे समर्थक शिवसेनेविरोधात आक्रमक
शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्याचे जाहीर केल्यामुळे संभाजीराजेंचे समर्थक संतप्त झाल्याचे समाजमाध्यमावर दिसून आले. राऊत यांच्या व्टिटवर अनेकांनी शिवसेनेला महागात पडेल, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोल्हापूरच्या शिवसेना नेत्यांचीही कोंडी
कोल्हापूरचेच असलेल्या संभाजीराजेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असताना, शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची कोंडी झाली आहे. या विषयावर कोणीही शिवसेना नेते फारसे बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतली एवढीच प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. खासदार धैर्यशील माने यांनीही फोन घेणे टाळले आहे.