सदाभाऊ झोपलेत काय?
By admin | Published: March 7, 2017 06:14 PM2017-03-07T18:14:34+5:302017-03-07T18:14:34+5:30
‘अडती’च्या प्रश्नात शिवसेनेची उडी : संजय पवार-काटे यांच्यात खडाजंगी
सदाभाऊ झोपलेत काय?
‘अडती’च्या प्रश्नात शिवसेनेची उडी : संजय पवार-काटे यांच्यात खडाजंगी
कोल्हापूर : गेली आठ दिवस बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गोंधळ सुरू असताना पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत काहीच भूमिका घेत नाहीत, ते झोपलेत काय? असा सवाल करत शिवसेनेने मंगळवारी अडतीच्या प्रश्नात उडी घेतली. सरकारच्या बघ्याच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सदाभाऊंवर निशाणा साधल्यानंतर ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे व पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
‘अडत देणार नाही,’ अशी भूमिका भाजीपाला व्यापाऱ्यांनी घेतल्याने गेले आठ दिवस बाजार समितीमध्ये पेच निर्माण झाला आहे. ‘अडत व्यापाऱ्यांकडूनच घ्यावी,’ असा कायदा सांगत असल्याने समिती व अडते या मुद्द्यावर ठाम आहेत; पण व्यापारीही आम्हाला परवडत नाही, म्हणून कोणत्याही परिस्थितीत अडत देणार नाही. यावर ठाम असल्याने हा गुंता निर्माण झाला आहे. याबाबत अनेक बैठका झाल्या, पण सरकारच्या पातळीवरून ज्या आक्रमकपणे हालचाली होणे अपेक्षित होते, त्या दिसत नाहीत. आठ दिवस मार्केट बंद असताना सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करता, अशी विचारणा करण्यासाठी मंगळवारी सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांची भेट घेतली. मार्केट सुरळीत करण्याचा आग्रह शिष्टमंडळाने धरला, सर्वच घटक आपले आहेत. अनेकांचे पोट या व्यवसायावर असल्याने सरकार म्हणून तुम्ही सामंजस्य तोडगा काढणे अपेक्षित होते. शेतकरी, खरेदीदारांना पोलीस संरक्षण देऊन सौदे पूर्ववत करण्याची मागणी विजय देवणे यांनी केली. त्यावर जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी तसे पत्र समितीला दिले.
त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बाजार समिती गाठली. तिथे सभापती सर्जेराव पाटील व संचालकांशी चर्चा करत असताना संजय पवार, रवी चौगुले यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. आठ दिवस बंद असताना समिती म्हणून काय भूमिका घेतली, शेतकऱ्यांचे नेते म्हणून मंत्रिमंडळात बसलेले सदाभाऊ खोत कुठे आहेत? असा सवाल रवी चौगुले यांनी केला. यावर सदाभाऊंनी चर्चा केलेली आहे, मार्ग निघेल, असे भगवान काटे यांनी सांगितले. कोणाशी चर्चा केली, सर्व घटकांची कोंडी झाली असताना आठ दिवस चर्चा कसली करता, अशा शब्दांत संजय पवार व विजय देवणे यांनी सुनावले.
आठवडी बाजार तळिरामांचे अड्डे!
शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट ग्राहकांच्या पिशवीत शेतीमाल देण्यासाठी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शहरात आठ-दहा ठिकाणी संत सावता माळी आठवडी बाजार सुरू करण्याची घोषणा केली. ही घोषणा हवेत विरली, एका ठिकाणी सुरू झाला, त्याची अवस्था काय आहे, तळिरामांचे अड्डे बनल्याची टीका संजय पवार यांनी केली.