शाळा व्यवस्थापन समितीत इतकं दडलंय तरी काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:11 AM2018-12-25T00:11:29+5:302018-12-25T00:11:47+5:30
दत्ता पाटील। म्हाकवे : लाभाचे, प्रतिष्ठेचे ना दारावर पाटी लावण्याचे पद तरीही प्रतिष्ठा, गट-तट, राजकीय पक्ष आणि आता यापुढे ...
दत्ता पाटील।
म्हाकवे : लाभाचे, प्रतिष्ठेचे ना दारावर पाटी लावण्याचे पद तरीही प्रतिष्ठा, गट-तट, राजकीय पक्ष आणि
आता यापुढे जाऊन देवादिकांच्या शपथी घेऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा घाट शाळाव्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी घातला जात आहे. यामुळे भावा शाळा व्यवस्थापन समितीत इतकं दडलयं तरी काय? असा सवाल जाणकार मंडळीतून व्यक्त होत आहे.
आघाडी सरकारच्या काळात आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे पालकांचे अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने आणि शिक्षकांवर नजर ठेवण्यासाठी पालकांतूनच प्रतिनिधी निवड करण्याची संकल्पना पुढे आली. यामध्ये प्रत्येक वर्गातून एक याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात येते. या समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. त्यामुळे हा कार्यकाळ संपला असून, जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये सध्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी सुरू आहेत.
काही शाळांतील पालकांमध्ये या निवडीला आणि पद प्रतिष्ठेला गौण मानून या निवडीची औपचारिकता पूर्ण केली. मात्र, मोठ्या गावात या निवडीलाही ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे मतदानाचे स्वरूप आले आहे. गट-तट, पक्ष पातळीवर युत्या करून जागा (तिकीट) वाटप करण्यात येत आहेत. तर अनेक ठिकाणी राजकीय हाडवैर असणारी मंडळी एकत्र येऊन जागा वाटप करीत आहेत. जागा वाटपाची चर्चा अंतिम करताना ग्रामदैवत, सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवांच्या शपथा२ही घेतल्या जात असल्याबाबत पालकांतून बोलले जात आहे.
'कागल'मध्ये चर्चेचा विषय...
कागलमधील एका गावात तर निवडणूक कोणतीही असली तरी त्या दोन गटांत विरोध ठरलेला. मात्र, पहिल्यांदाच येथील दोन स्थानिक गट एकत्र येऊन संबंधित गावातील शाळा व्यवस्थापन समितीच्या जागा वाटप करीत आहेत. अध्यक्षपदाच्याही एक-एक वर्षासाठी वाटण्या केल्या आहेत. यासाठी चक्क तीर्थक्षेत्रावर जाऊन शपथ विधीही केल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, हा सलोखा शाळेसह गावच्या विकासासाठीही कायम राहणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
गट बदलण्याचीही तयारी
कागलमध्ये पदासाठी गट बदलणे नवीन नाही; परंतु शाळा व्यवस्थापन समितीत आपल्या सौभाग्यवतीला स्थान मिळविण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असणाºया गटाला रामराम करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे त्याला ही जागा देऊ केली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच विरोधी नेत्यानेच हा आपल्याकडे उमेदवारी मागत असल्याचे सांगून बिंग फोडले.
पाल्याच्या गुणवत्तेचा पर्याय वापरावा
मुलांच्या समोरच या निवडी केल्या जातात. यावेळी काही वेळा हमरीतुमरीचे प्रसंगही घडतात. त्यामुळे निवडणुकीऐवजी प्रत्येक वर्गातील पहिल्या क्रमांकाच्या पाल्यांच्या पालकांना प्रतिनिधित्वाची संधी द्यावी. ते इच्छुक नसतील किंवा बाहेरगावी राहत असतील तर दोन नंबरच्या पाल्याच्या पालकांना संधी द्यावी. यामुळे प्रतिनिधित्व करू इच्छिणाºयांमध्ये आपल्या पाल्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्पर्धा वाढेल.