पोटनिवडणुकीच्या जय-पराजयात दडलंय काय?
By admin | Published: April 16, 2015 11:35 PM2015-04-16T23:35:54+5:302015-04-17T00:13:10+5:30
नव्या नेतृत्वाचा उदय : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाला पहिल्या महिला आमदार
अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकीय पटलावर सुमनताई रावसाहेब पाटील या नव्या महिला नेतृत्वाचा उदय झाला. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने भविष्यातील राजकारणाची अनेक बीजे पेरली गेली, तर अनेक प्रश्नही निर्माण केले, परंतु सुमनताई पाटील यांच्या विजयात आणि अपक्ष उमेदवाराच्या पराभवात दडलंय काय, याची चर्चा मतदारसंघात जोरदार सुरू आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे या पोटनिवडणुकीत शांत राहणे आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे या निवडणुकीत भाग घेणे, या दोन भूमिका भविष्यातील राजकीय संघर्षाच्या व नवीन राजकीय समीकरण निर्माण करणाऱ्या ठरणार आहेत.
सुमनताई पाटील यांनी विजय मिळवून मतदारसंघाचे नेतृत्व स्वीकारले, परंतु आर. आर. पाटील तथा आबांची अफाट लोकप्रियता, सर्वसामान्यांचे आबांवरील प्रेम, त्यांनी मतदारसंघात केलेली अफाट विकासकामे याचा सुमनतार्इंच्या विजयात मोठा वाटा आहे. विकास हा मुद्दा बाजूला राहून भावनेच्या आधारावर ही पोटनिवडणूक लढली गेली.
सुमनताई पाटील यांच्यारूपाने तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघाला पहिल्या महिला आमदार लाभल्या. मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दु:खातून बाहेर काढून आधार देणे, हे काम त्यांना प्रथम करावे लागणार आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तसेच पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये असणारे गटा-तटाचे राजकारण संपवावे लागणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांना प्रामुख्याने सोडवावा लागणार आहे. ढालगाव परिसराला आबांनी दिलेला टेंभू योजनेचा शब्द त्यांना पूर्ण करावा लागणार आहे. अशा अनेक विकास कामांना प्राधान्य देऊन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संपर्कात ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.
भाजपचे बंडखोर स्वप्नील पाटील यांच्या पराभवात अनेक राजकीय बाबी लपल्या आहेत. मुळात ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे सर्वसामान्य जनतेला वाटत होते. परंतु स्वप्नील पाटील यांनी पोटनिवडणुकीत उडी घेतल्याने यामागे कोणाची राजकीय चाल असावी, असा प्रश्न मतदारसंघात निर्माण झाला. अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्नील पाटील यांच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतल्याने ही पोटनिवडणूक सुमनताई पाटील विरोधात घोरपडेंचे कार्यकर्ते असे चित्र निर्माण झाले. प्रत्यक्ष मतदानादिवशी कवठेमहांकाळ तालुक्यात असेच चित्र दिसत होते. स्वप्नील पाटील यांच्या पराभवातून घोरपडे गटाचे राजकीय मनसुबे मतदारांनी उधळल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पोटनिवडणुकीत अनेक राजकीय बीजे पेरली गेली आहेत, तर भविष्यातील राजकारणही लपले आहे. प्रश्न आहे तो या राजकीय पटलावर भविष्यात कोण कशी चाल खेळतो हाच. घोरपडे गटाच्या भूमिकेला मतदारांनी नाकारले. या पोटनिवडणुकीत खा. पाटील यांचे शांत राहणे, तर घोरपडे यांचे निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणे, या दोन्ही भूमिका भविष्यातील राजकीय संघर्षाच्यादृष्टीने महत्त्वाच्या व मतदारसंघातील राजकारण स्पष्ट करणाऱ्या ठरणार आहेत. पोटनिवडणुकीच्या जय-पराजयात भविष्यातील राजकीय संघर्षाची बीजे पेरली गेल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
घोरपडे गटाला मतदारांनी नाकारले
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्निल पाटलांच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतल्याने ही पोटनिवडणूक सुमनताई पाटील विरोधात अजितराव घोरपडेंचे कार्यकर्ते, असे चित्र निर्माण झाले. प्रत्यक्ष मतदानादिवशी कवठेमहांकाळ तालुक्यात मतदार कार्यकर्ते असे चित्र निर्माण झाले. स्वप्निल पाटील यांच्या पराभवातून घोरपडे गटाचे राजकीय मनसुबे मतदारांनी उधळल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपचे घोरपडे स्वप्निल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाले असताना खासदार संजयकाका पाटील यांनी मात्र प्रचारात सहभाग घेतला नव्हता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीला मदत केल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून स्पष्ट दिसत आहे. एवढेच नव्हे, तर संजयकाका पाटील यांच्या चिंचणी या गावातही सुमनताई पाटील यांना मतदानाची आघाडी मिळाली आहे.
आर. आर. पाटील (आबा) यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीतील विजयानंतर उत्साह दिसत असल्याचे चित्र आहे.