पाचचे पाच हजार होणार नाही, याची खात्री काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:00 AM2018-09-19T01:00:55+5:302018-09-19T01:00:58+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटनंतर कार्यक्षेत्राबाहेरील केवळ पाचच सभासद करणार असल्याचे सत्तारूढ गटाचे नेते महादेवराव महाडिक सांगत आहेत; पण पाचचे पाच हजार होणार नाहीत, याची खात्री कोण देणार? असा सवाल करीत या मंडळींचे हात दगडाखाली सापडल्याने त्यांची फेकाफेकी सुरू आहे. महाडिक यांनी अशा प्रकारची धूळफेक बंद करावी, अशी माहिती ‘गोकुळ बचाव कृती समिती’च्या वतीने पत्रकातून दिली आहे.
‘मल्टिस्टेट’मुळे दूध उत्पादकांपेक्षा एका व्यापाऱ्याचा फायदा होणार आहे, तरीही हा निर्णय कसा फायदेशीर आहे, हे पटवून सांगण्याची केविलवाणी धडपड नेते करीत आहेत. कार्यक्षेत्र वाढल्यानंतर तेथील दूध संस्थांना सर्व सोई-सुविधा देणे कायद्याने बंधनकारक होणार आहे. त्याचा भार कोल्हापुरातील संस्थांना सहन करावा लागणार आहे. ‘दौलत’मधील चुकीच्या कारभारावरून संचालक मंडळ बरखास्त करावे व कारभाराची चौकशी करण्याची मागणी स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांनी केंद्र सरकारकडे अनेक वेळा केली होती. या मागणीची साधी दखलही केंद्राने घेतली नाही. मग जिल्ह्णातील दूध संस्थांचे ऐकून कोण घेणार? सभासदांचा आवाज दडपण्यासाठी ‘मल्टिस्टेट’चा घाट आहे. त्याचबरोबर सध्या बाहेरून दूध घेतल्याने कोट्यवधींचा तोटा होतो; मग मल्टिस्टेटचा अट्टहास का? असा सवालही बचाव कृती समितीचे किशोर पाटील, किरणसिंह पाटील, बाबासाहेब चौगुले, आदींनी केला आहे.
'अमूल'मध्ये पाकीट संस्कृती नाही
‘गोकुळ’ मल्टिनॅशनल करण्याची भाषा करणारे धनंजय महाडिक यांनी आपण मल्टिनॅशनल नव्हे, तर कोल्हापूरचे खासदार आहोत याची जाणीव ठेवावी. ‘गोकुळ’ वाढला पाहिजे, त्याची उत्पादने परदेशात गेली पाहिजेत; पण खासदारसाहेब, संघच परदेशी करू नका. ‘अमूल’ची तुलना करता; तिथे संचालकांना फिरण्यासाठी स्कॉर्पिओ गाड्या नाहीत, तिथे पाकीट व कमिशन संस्कृती नाही. त्याचबरोबर लोण्याचे कॉँट्रॅक्ट घेणारा नेता ‘अमूल’मध्ये नाही. वासाचे दूध काढून त्याचे लोणी कोणी लाटत नाही, हेसुद्धा खासदार महाडिक यांनी जाणून घ्यावे, असेही पत्रकात म्हटले आहे.