‘स्वबळ’ म्हणजे काय रे भाऊ ?
By Admin | Published: December 22, 2016 11:46 PM2016-12-22T23:46:45+5:302016-12-22T23:46:45+5:30
कार्यकर्त्यांना प्रश्न : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका
ज्योतीप्रसाद सावंत ल्ल आजरा
नगरपंचायतीचे वादळ शमते न शमते तोच आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपची नेतेमंडळी या निवडणुका ‘स्वबळावर’ लढणार अशी भीमगर्जना करू लागले आहेत. सुरुवातीला स्वबळाची भाषा व शेवट आघाडी, स्थानिक आघाडी, महाआघाडी, युती असाच होत असल्याने कार्यकर्त्यांना आता ‘स्वबळ’ म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न विचारावा लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जागावाटपात दबाव निर्माण करण्यासाठी प्रमुख पक्षांची नेतेमंडळी ‘स्वबळावर’ निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा करीत आहेत. प्रथम स्वबळाची भाषा त्यानंतर ज्या पक्षासोबत निवडणुकीला सामोरे जायचे त्या पक्षासोबत वाटाघाटीच्या फेऱ्या, ताणाताणी आणि शेवटी एखाद्या ठिकाणी ‘मैत्रिपूर्ण’ लढतीचे गोंडस नाव देऊन इतरत्र आघाडी प्रमुखांचा गळ्यात गळे घालून, हात उंचावून विजयाची खूण करीत दिसणारी छायाचित्रे, असा प्रकार वारंवार जिल्हा, गावपातळीपासून अनुभवताना दिसतो आहे.
स्वबळाच्या भाषेत जोर असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेटाने कामाला लागतात. यामुळे अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधातील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना दिसतो. हा संघर्ष अगदी शिवीगाळ, मारामारी, बाचाबाची असा होऊन पोलिस ठाण्याच्या दारापर्यंत कधी गेला, हे कार्यकर्त्यांच्याही लक्षात येत नाही. काही कार्यकर्त्यांना ज्या पक्षासाठी अथवा संघटनेसाठी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवावे लागतात. त्यापैकी वरिष्ठ नेत्यांच्या तडजोडीमुळे अनेक पक्ष, संघटन यांची चिन्हेदेखील गायब होताना दिसतात.