सकाळी किती वाजता उठता, रात्री कधी झोपता..?; केंद्र सरकार करणार सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:47 AM2023-12-29T11:47:42+5:302023-12-29T12:02:32+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : तुम्ही सकाळी किती वाजता उठता, दिवसभर काय करता, रात्री किती वाजता झोपता याचे सर्वेक्षण आता ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : तुम्ही सकाळी किती वाजता उठता, दिवसभर काय करता, रात्री किती वाजता झोपता याचे सर्वेक्षण आता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून (दि. १ जानेवारी) देशभरामध्ये हे सर्वेक्षण होणार असून त्यासाठीची प्रश्नावली ही तयार करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत हे सर्वेक्षण चालेल. ‘ वेळेचा उपयोग सर्वेक्षण ’ असे याला नाव देण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या या विभागाच्या वतीने १९५० पासून विविध प्रकारची सर्वेक्षणे करण्यात येतात. सध्या उद्योग, गृह, सूक्ष्म, लघु, मध्य व कुटिल उत्पादने, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील सर्वेक्षण सध्या देशभरामध्ये सुरू आहे. आता यामध्ये या नव्या सर्वेक्षणाची भर पडली आहे. त्यानुसार आता या विभागाचे सर्वेक्षक संबंधित घरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची माहिती संकलित करतील. त्यामध्ये पूर्ण नाव, पत्ता,व्यवसाय, नोकरी, संपर्क क्रमांक ही सर्व वैयक्तिक माहिती भरून घेतली जाईल.
याचबरोबर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय आणि किती वेळ करते याची सविस्तर नोंद घेण्यात येणार आहेत. किती वाजता उठता इथंपासून मग सकाळची आवराआवर झाल्यानंतर नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी किती वेळ जाता, तिथे किती वेळ काम करता, घरी कधी येता, संध्याकाळी दूरचित्रवाणी पाहण्यापासून ते कुटुंबासोबत किती वेळ घालवता, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी किती प्रवास करावा लागतो याची माहिती संबंधितांकडून घेण्यात येणार आहे.
घरच्या शेती, जनावरांपासून ते पारंपरिक व्यवसाय पर्यंतची सर्व माहिती यामध्ये घेतली जाईल. अगदी गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिला २४ तासात किती वेळ आणि कोणते काम करतात याचीही इत्यंभूत माहिती घेतली जाणार आहे.
गावातील, वाॅर्डातील १४ कुटुंबांचे सर्वेक्षण
प्रत्येक गावातील आणि मोठ्या शहरातील प्रत्येक वॉर्डातील १४ कुटुंबांचे अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहाटे चार ते दुसऱ्या दिवशी पहाटे चार या काळात या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती किती वेळ, कोणते काम करते याचे संकलन या सर्वेक्षणातून करण्यात येणार आहे. यामध्ये अगदी मोबाइलवर ही किती वेळ जातो हे देखील तपासले जाणार आहे.
वेळेचा उपयोग याबाबतचे हे सर्वेक्षण होणार असून यासाठी घरी आलेल्या सांख्यिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. या सर्वेक्षणाचा देशाची धोरणे ठरवण्यासाठी उपयोग होत असल्याने सत्य माहिती द्यावी. - आर. डी. मीना वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोल्हापूर