प्राध्यापकांच्या संपात विद्यार्थ्यांचा ‘बळी’ का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:42 AM2018-10-08T00:42:02+5:302018-10-08T00:42:10+5:30
कोल्हापूर : आम्ही वेळेत शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क भरले आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा पंधरा दिवसांवर आली आहे. अशा स्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत आम्ही कुणाकडे दाद मागायची? प्राध्यापक आणि राज्य शासन यांच्यामध्ये आमचे शैक्षणिक नुकसान का करता? असा सवाल कोल्हापुरातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतून उपस्थित केला जात आहे. प्राध्यापकांच्या काम बंद आंदोलनप्रश्नी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा. आंदोलन मागे घेण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
गेल्या बारा दिवसांपासून प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात कायम आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापक (सीएचबी) सहभागी झाल्याने जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांतील शिकविणे बंद झाले आहे. या आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या.
महावीर महाविद्यालयात बी. ए. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारी सुप्रिया जाधव म्हणाली, या आंदोलनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना एकप्रकारे सुट्टी मिळाली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर तास होत नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे आंदोलन थांबविण्यासाठी प्राध्यापकांच्या मागण्यांची सरकारने लवकर पूर्तता करावी. मेघा दोरकर म्हणाली, उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढीच्या अनुषंगाने असलेल्या मागण्या घेऊन प्राध्यापकांचे सुरू असलेले आंदोलन योग्य आहे पण या आंदोलनामुळे युवा महोत्सव लांबणीवर पडला आहे. त्याच्या तयारीत अनेक विद्यार्थी कलाकारांनी पाच-सहा महिने व्यतीत केले आहेत.
पहिल्या सत्रातील परीक्षा जवळ आल्या आहेत. एकूणच विद्यार्थिहित लक्षात घेऊन हे आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने मार्ग काढणे आवश्यक आहे.
विवेकानंद महाविद्यालयातील बी. ए. भाग तीनमधील राजू शेख म्हणाला, या आंदोलनाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. सरकारने प्राध्यापकांच्या संघटनेशी चर्चा करून मागण्यांची पूर्तता करावी. शिक्षणावरील खर्चामध्ये सरकारने वाढ करावी.
शिवप्रसाद शेवाळे म्हणाला, तोंडावर आलेल्या परीक्षा लक्षात घेऊन सरकारने या आंदोलनाबाबत तोडगा काढावा. आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता सरकार आणि प्राध्यापक संघटनांनी घ्यावी.
शहाजी कॉलेजमध्ये बी. ए. भाग तीनचा विद्यार्थी राजवर्धन बिरंजे म्हणाला, राज्य शासन आणि महाविद्यालयाच्या नियमानुसार आम्ही शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क वेळेत भरले आहे. सतरा दिवसांवर पहिल्या सत्रातील परीक्षा आली आहे.
विविध विषयांचा अजून २० टक्के अभ्यासक्रम शिकविणे बाकी आहे. या आंदोलनाच्या स्थितीत आम्ही कुणाकडे दाद मागायची? हे आंदोलन लवकरात लवकर मिटावे. प्राध्यापक संघटना आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये.
काही ठिकाणी ‘सीएचबी’ प्राध्यापकांचा आधार
काही महाविद्यालयांत ‘सीएचबी’धारक प्राध्यापक तास घेत असल्याने आगामी परीक्षेच्या तोंडावर तेथील विद्यार्थ्यांना त्यांचा काहीसा आधार मिळत आहे.
मात्र, या ‘सीएचबी’धारक प्राध्यापकांना तास घेण्यात काही मर्यादा येत आहेत.
कायम आणि ‘सीएचबी’धारक प्राध्यापक आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना तास होत नसल्याने सुट्टी मिळाली आहे.