विस्मृती का होते?--
By Admin | Published: May 5, 2017 11:58 PM2017-05-05T23:58:49+5:302017-05-05T23:58:49+5:30
आयुर्वेद
मुलांनो, तुम्हाला प्रत्यक्ष घडलेली एक गोष्ट सांगतो. आमच्यासमोर एक वृद्ध गृहस्थ राहत होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा, सून, परिवारातील इतर माणसंही राहत होती. काही कार्यक्रमासाठी ते कोल्हापूर सोडून आपल्या मूळच्या गावी गेले. ते गाव तर त्यांचं लहानापासून मोठं होईपर्यंतचं! एके दिवशी ते आजोबा सकाळी घराबाहेर फिरायला म्हणून जे पडले ते गायबच! तीन दिवस-रात्र घरची माणसं शोध घेत होती; पण सापडले नाहीत. एके दिवशी त्यांचा शेजारी रस्त्यावरून चालला होता. त्याला हे आजोबा ओळखीचे वाटले. त्याने घरी येऊन सांगितल्यावर त्या आजोबांना सर्वजण घरी घेऊन आले. पुढे त्यांना औषधानं थोडं बरं वाटलं; पण त्या दिवशी जे झालं ते विपरीतच. बाहेर पडल्यावर आजोबा डावीकडे वळण्याऐवजी उजवीकडे वळले आणि पुढे सारेच विसरले. अगदी स्वत:चे नावही त्यांना आठवेना!
‘हे असं का होतं? माणसाला विस्मृती का होते? जसं आपल्या इतर अवयवांची झीज होते, तसेच काहीसं मेंदूच्या बाबतीत होतं. त्याचा आकारही वयाप्रमाणे लहान होतो. काही वेळा अती मानसिक किंवा बौद्धिक ताणाने अशी विस्मृती होते; पण ती तात्पुरती असते. योग्य उपचाराने बरे वाटू लागते. काही वेळा काही औषधांचा परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होतो. उदा. झोपेची औषधे सतत घेणे. काही आजारांमध्ये स्मृती कमी होते. विशेषत: मानसिक आजार. म्हातारपणी होणाऱ्या विस्मृतीला आपण काही प्रमाणात टाळू शकतो.’
सेनापती बापटांची मी एक गोष्ट ऐकली होती. ते वृद्धपणी जिन्याच्या पायऱ्या मोजायचे. असं का? म्हणून विचारलं तर ‘आकडे विसरू नयेत म्हणून,’ असं उत्तर द्यायचे. या गोष्टीत तथ्य आहे. आपण आपली स्मरणशक्ती रोजच्या रोज वापरली तर ती तल्लख राहते. कदाचित आपल्या पूर्वजांना हे माहीत असावं. त्यामुळे वेगवेगळे स्तोत्रं, श्लोक पाठ करून घेत असत. तुम्हाला जे जे काही माहीत आहे त्याची उजळणी करीत राहिले तरच ते लक्षात राहते. नाहीतर ते विस्मृतीच्या गर्तेत जाते.
स्मरणशक्तीचे कशाला? वयाप्रमाणे आपली सर्वच इंद्रिये हळूहळू आपली कार्यशक्ती गमावून बसतात. वयाच्या प्रमाणात ते योग्यच असते. किंबहुना ते स्वीकार करण्यातच शहाणपण असते. मला अगदी तरुणपणासारखं ऐकायला यायला हवं, दिसायला हवं, असं शक्य नसतं. फक्त या ठिकाणी आपण श्रवण इंद्रियांना किंवा डोळ्यांना उपकरणं वापरून मदत करू शकतो.
हे सर्व टाळता येईल का? आयुर्वेदाने याचा सूक्ष्म विचार केला आहे. उदा. एखादी पेशी शरीरात तयार होते. काही काळ काम करते व नंतर मरुन जाते. असं चक्र आपल्या शरीरात सतत चालू असतं. जर काही प्रमाणात का होईना मधली स्थिती लांबवू शकलो तर आपण चांगले तंदुरुस्त राहू शकू. आपल्या शरीराची झीज सतत चालू असते. ती भरून काढता यायला हवी. ऋषीमुनींना हे सूत्र ठाऊक असावे. त्यांनी त्याला ‘रसायन’ असं नाव दिलं. या गटात अनेक वनस्पती येतात. वेगवेगळ्या अवयवांची झीज होत असल्याने अशी अनेक औषधे आहेत. बिब्बा, वावडिंग, शंखपुष्पी अशा अनेक वनस्पतींचा या गटात वापर करायला सांगितला आहे. आपणा सर्वांना माहीत असलेलं असं प्रसिद्ध रसायन म्हणजे ‘च्यवनप्राश!’ आवळ्यापासून ते तयार करतात. त्यात इतरही अनेक वनस्पती आहेत. च्यवन ऋषींनी तो शोधला म्हणून हा ‘च्यवनप्राश.’ थंडीच्या दिवसांत (विशेषत: ज्या काळात आवळे येतात तो काळ) सेवन केला तर आपल्याला स्फूर्ती मिळते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते व वारंवार आजारपण येत नाही.
अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियांचा विचार आयुर्वेदात केला आहे व त्यानुसार वेगवेगळी रसायनेही सांगितली आहेत. त्यांच्या सेवनाने इंद्रियांची शक्ती वृद्धापकाळातही चांगली राहते. ऋतुमानाप्रमाणे, वयाप्रमाणे, आजारांप्रमाणे सेवन करण्याची रसायने वेगवेगळी आहेत. त्यांचा उपयोग तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने केलात तर एका तत्त्वज्ञाने म्हटल्याप्रमाणे होऊ शकते. तो म्हणाला, ‘माणसाने तरुणपणीच मरावं, पण जास्तीत जास्त उशिरा.’ - डॉ. विवेक हळदवणेकर(लेखक प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत)