पारंपरिक गादी व्यवसायाला घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:48+5:302021-04-06T04:21:48+5:30
उचगाव : गावोगावी फिरून बलुतेदारी पध्द्तीने गादी व्यवसायातून संसार सावरणाऱ्या पिंजारी समाजाच्या पारंपरिक गादी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. ...
उचगाव : गावोगावी फिरून बलुतेदारी पध्द्तीने गादी व्यवसायातून संसार सावरणाऱ्या पिंजारी समाजाच्या पारंपरिक गादी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. गेले वर्षभर कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीत थंडावलेली लग्नसराई, बंद पडलेली वसतिगृहे, लॉजिंग-बोर्डिंग यामुळे गादी बनिवण्याचे कामच मिळेनासे झाले आहे. त्यामुळे या व्यवसायावर गुजराण असणाऱ्या पिंजारी समाजातील शेकडो कुटुंबांची परवड सुरू आहे. ब्रँडेड गाद्या कारखान्यांच्या चढाओढीत पारंपरिक पिंजारी समाजाचा गादी व्यवसाय आधीच आतबट्ट्यात आला आहे. त्यात कोरोनाने त्यांची हक्काची रोजीरोटीही हिसकावून घेतल्याने हा समाज थेट रस्त्यावर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गाद्या बनवून देणाऱ्या पिंजारी समाजाची संख्या अल्प आहे. या समाजातील असंख्यजण पिढीजात गादी बनवून देण्यासाठी ओळखले जातात. आजही गावोगावी फिरून बलुतेदारीवर गाद्या बनवून देण्याचे काम ते करतात. ज्याची शेती आहे, असे शेतकरी त्यांना धान्याच्या स्वरूपात मदत करतात, तर काहीजण रोखीने पैसे देतात. पिंजारी समाजात आजही आर्थिक मागासलेपणा तसेच शिक्षणाचा अभाव आहे. बलुतेदारी व्यवसायामुळे भांडवलाची कमतरता आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या गाद्या तयार करणारा हा कारागीर शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिला आहे.
कोट : सध्या हा व्यवसाय
गावोगावी जोडलेल्या बलुतेदारीवर सुरू आहे. पारंपरिक व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. गेली वीस वर्षे हा धंदा करतोय. कापसाचा भाव वाढल्याने हा धंदा परवडत नाही. गादीचा कापूस ९०-१२० रु. किलो झाला आहे. कापसाची गादी, कापडी मटेरियलची किंमत आणि मेहनत यांचा विचार केल्यास आता हाती काही शिल्लक राहत नाही.
रमजान पिंजारी, गादी कारागीर
कोट : कोरोनामुळे गादी बनविणाऱ्यांचे फार नुकसान झाले. कामगारांना काम नाही, लोकांजवळ पैसा नाही.
बॉक्स गाद्या, सोफासेट, फोम गाद्या, लोड, तक्के, उशी असे आम्ही गावोगावी फिरून विकतो. दोन-तीन कर्मचारी कामाला आहेत. महिन्याला कामगार पगार जाऊन १०-१५ हजार रुपये शिल्लक राहतात. कोरोनामुळे बनवलेल्या गाद्यांची मागणी कमी आहे.
रमजान गुलाब पिजारी (आळतेकर), कारागीर
फोटो : ०५ गादी कारागीर
ओळ : करवीर पूर्व भागात उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी या भागात फिरून गाद्या तयार करणारे रमजान पिंजारी.