खासगी बसचे चाक पुन्हा रुतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:58+5:302021-03-22T04:21:58+5:30
कोल्हापूर : कोविड-१९ मुळे एप्रिल २०२० मध्ये बंद झालेली खासगी बस वाहतूक काहीअंशी सुरळीत होऊ लागली होती. तोपर्यंत पुन्हा ...
कोल्हापूर : कोविड-१९ मुळे एप्रिल २०२० मध्ये बंद झालेली खासगी बस वाहतूक काहीअंशी सुरळीत होऊ लागली होती. तोपर्यंत पुन्हा कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे खासगी बस वाहतूकदार पुन्हा अडचणीत आले आहेत. याशिवाय बँकांचे हप्ते तटल्यामुळे बँकांचे अधिकारी वसुलीसाठी दारात येऊ लागल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. एकूणच काय, खासगी बसचे चाक खोलवर पुन्हा रुतले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील ३५० पैकी १८५ बसेसच रस्त्यावर धावत आहेत. अन्य बस मालकांनी डिझेल दरवाढीमुळे व प्रवासीच नसल्यामुळे बस अक्षरश: दारात उभी केली आहे.
मागील वर्षी २५ मार्चनंतर प्रथम रेल्वे त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद झाली. त्यानंतर खासगी बसेसही हळूहळू बंद होऊ लागल्या. कोरोनाचा संसर्ग जसा वाढू लागला, तसे लाॅकडाऊन आणि प्रवासी वाहतुकीला निर्बंध आले. त्यामुळे सरकारने खासगी बसेसनाही प्रवासी वाहतुकीस बंदी घातली. ही बंदी तब्बल ७ महिने लागू होती. या काळात खासगी बसेस मालकांचे बँकांचे हप्ते, चालक व अन्य कर्मचाऱ्यांचा पगार अंगावर बसला. एनकेन प्रकारे बसेस मालकांनीही हा खर्च उधार-उसनवार करीत निभावून नेला. बसेस रस्त्यावर पूर्ण क्षमतेने येण्यास जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडला. कोल्हापुरातही पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने येऊ लागले. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागला. त्यामुळे पुन्हा सरकारने निर्बंध आणण्यास सुरुवात केली. त्यात भर म्हणून गेल्या काही महिन्यांपासून डिझेलमध्ये झालेल्या भरमसाट वाढीमुळे प्रवासी संख्याही घटली आहे. मार्च महिना असल्यामुळे थकलेले हप्ते भरण्यासाठी बँकांचाही लकडा बसेस मालकांच्या मागे लागला आहे. एका बाजूने व्यवसाय नाही, प्रवासी संख्या घटली आणि त्यात बँकांनीही वसुलीचा तगादा लावल्याने बस मालक अक्षरश: कात्रीत सापडले आहेत. काही बसेस मालक इतके अडचणीत आलेत की, त्यांना दैनंदिन खर्च चालविणेही अवघड झाले आहे. त्यांनी आपल्या बसेस दारात उभ्या करणेच पसंत केले आहे. कारण मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर मार्गावर प्रवासी संख्या घटली आहे. या मार्गावर किमान ४० प्रवासी असतील तरच डिझेल, चालक, वाहक पगार निघतो. त्यातून काहीअंशी दुरुस्ती देखभाल खर्च निघतो. मात्र, या मार्गावर प्रवासी संख्याच घटल्यामुळे बसेस कोणत्या आणि कशा पद्धतीने चालवायच्या, असा प्रश्न बस मालकांच्या पुढे उभा आहे.
बसेस संख्या अशी...
- कोरोनाआधी बाहेर जाणाऱ्या मार्गावर ३५० बसेस धावत होत्या.
- कोरोनानंतर सध्या १८५ बसेस या मार्गावर धावत आहेत.
चौकट
गेल्या नऊ महिन्यानंतर खासगी बसेस पूर्ण क्षमतेने पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, गोवा, बंगलोर, अहमदाबाद, हैदराबाद आदी मार्गावर धावत होत्या. त्यात डिझेल दरवाढ आणि कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने प्रवाशांची संख्याही घटली आहे. त्यामुळे काही बसेस मालकांनी खर्चाचाच ताळमेळ बसेना म्हणून तब्बल १६५ बसेस दारातच उभ्या केल्या आहेत. याशिवाय बँकेचे हप्ते तटल्यामुळे बँकांनीही मार्च महिन्याची वसुली करण्याचा तगादा लावला आहे. थेट जप्तीचा मार्ग अवलंबल्यामुळे बसमालक हवालदिल झाले आहेत. सरकारने इतर राज्यांप्रमाणे टोल, कर निम्म्यावर आणावेत, जेणेकरून बसमालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा या व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
कोट
कोरोनामुळे आधीच हा व्यवसाय घाईला आला आहे. त्यात डिझेल दरवाढ आणि बँकांनीही थेट वसुलीसाठी जप्तीचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे व्यवसाय नसल्याने हवालदिल झालेला बसमालक आणखीनच धास्तावला आहे. त्यामुळे सरकारने वेळीच हस्तक्षेप करून बस मालकांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे बसमालकांनीही आत्महत्या केली, तर आश्चर्य वाटायला नको.
- सतीशचंद्र कांबळे,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा खासगी आराम बस मालक संघटना.
प्रतिक्रिया
काहीअंशी रुळावर येणारी बससेवा पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागल्यामुळे अडचणीत आली आहे. त्यात बँकांची वसुली आणि प्रवासी संख्या घटल्यामुळे ताळमेळ कसा बसवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर सरकारने इतर राज्यांप्रमाणे करासह टोलमध्ये माफी द्यावी.
- गौरव कुसाळे, ट्रॅव्हल्स मालक.
प्रतिक्रिया...
कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यात डिझेल दरवाढ आणि बँकांची जप्ती यामुळे खासगी बसमालक अक्षरश: कोलमडून गेला आहे. यावर सरकारने काही तरी उपाय काढावा. अन्यथा हा व्यवसाय कोलमडेल आणि बेरोजगारीतही वाढ होईल.
- रियाज मुजावर, ट्रॅव्हल्स मालक.