जास्त हवा भरली की, फुगा फुटतोच: दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:10 AM2018-08-20T01:10:00+5:302018-08-20T01:10:05+5:30

When the air is full, the bubble bursts: Diwakar delivers | जास्त हवा भरली की, फुगा फुटतोच: दिवाकर रावते

जास्त हवा भरली की, फुगा फुटतोच: दिवाकर रावते

googlenewsNext

कोल्हापूर : अनाठायीपणा टाळा. बुद्धी शाबूत ठेवून विरोधकांचे गनिमी कावे ओळखून कार्यरत राहा. जास्त हवा भरली, की फुगा फुटतोच; त्यामुळे आविर्भावात राहू नका, अशा शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी येथे शिवसैनिकांना दक्ष राहण्याबाबत इशारा दिला.
शिवसेनेच्या कोल्हापूर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. येथील केशवराव भोसले नाट्यगृहातील मेळाव्यास शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर प्रमुख उपस्थित होत्या. या मेळाव्याद्वारे आमदार क्षीरसागर यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. परिवहनमंत्री रावते म्हणाले, शिवसैनिक हा विकाऊ नव्हे, तर टिकाऊ आहे. निवडणुकांतील यश-अपयशापेक्षा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी लढा. या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातून दहा आमदार, दोन खासदार निवडून देण्यासह हॅट्ट्रिक करण्याची ग्वाही दिली. मात्र, आपण परिस्थिती समजून घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो, तरच यश मिळेल. संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले, विरोधकांनी कितीही हल्ले केले, तरी शिवसेना डगमगणार नाही. कोल्हापूरमध्ये सेनेमध्ये गट-तट काही नाहीत. उपनेते बानुगडे-पाटील म्हणाले, सदासर्वकाळ राजकारण करायचे असेल, तर विचार आणि काम महत्त्वाचे आहे. आमदार क्षीरसागर म्हणाले, आंदोलनांच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून दिला. सध्या कोल्हापुरात दबावाचे राजकारण सुरू आहे. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, त्याला न घाबरता मी, माझे कार्यकर्ते कोल्हापूरकरांवरील अन्यायासाठी लढा देत राहू.
मेळाव्यात सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेतेपदी निवड झाल्याबद्दल मंत्री रावते यांचा आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन सत्कार केला. वीरपत्नी हौसाबाई चौगुले, मालूबाई मगदूम, केरूबाई पाटील यांना एस.टी.च्या मोफत प्रवासाचे स्मार्टकार्ड हे मंत्री रावते यांच्या हस्ते प्रदान केले. विविध स्पर्धांत यश मिळविलेल्या पैलवानांचा सत्कार केला. यानंतर सुनील मोदी, दीपक गौड, उदय पोवार, जितेंद्र इंगवले यांनी मनोगतातून कोल्हापुरात शिवसेनेला भरघोस यश मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी रविकिरण इंगवले, नगरसेवक नियाज खान, रघुनाथ खडके, अमर समर्थ, मंगल साळोखे, अभिजित चव्हाण, आदी उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक, अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले. विशाल देवकुळे यांनी आभार मानले.
आगामी निवडणुकीची लढाई सोपी नाही
सांगली निवडणुकीतील मतमोजणीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री आपल्या ४५ जागा येणार असून महापौरपदाचे बघायला तेथे जावा, असे कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना सांगतात. त्यावरून लक्षात घ्या की, आगामी निवडणुकीची लढाई सोपी नाही, असे मंत्री रावते यांनी सांगितले. ते म्हणाले, संपर्क नेतेपदी निवड झाल्यानंतर कामाची सुरुवात करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाने करत आहे. सन २०१९ मध्ये मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकेल.
हॅट्ट्रिकसाठी मते महत्त्वाची
आमदार क्षीरसागर यांची हॅट्ट्रिक करायची, की नाही हे तुम्ही ठरवा. लोकशाही असल्याने हॅट्ट्रिक करण्यासाठी जनतेची मते महत्त्वाची आहेत. ते लक्षात घ्या, असा सल्ला मंत्री रावते यांनी क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले, टीकादेखील सकारात्मकपणे घ्या. शिवसेनाप्रमुखांनी रुजविलेले राष्ट्रीयत्व विचार कृतीतून दिसले पाहिजे.

Web Title: When the air is full, the bubble bursts: Diwakar delivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.