जेव्हा बाप्पा रुसतात...सुखकर्ता दु:खकर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:17 AM2018-09-13T01:17:02+5:302018-09-13T01:17:17+5:30
इंदुमती गणेश
आज पहाटेपासूनच कैलासावर लगबग सुरू होती. उंदीरमामा सजून-धजून केव्हाचे प्रवेशद्वारावर येऊन थांबले होते. पार्वतीमाता बाळासाठी मोदक बनवत होत्या. सेवक-सेविका सामानाची बांधाबांध करत होत्या; तर बाबा शंकरोबा सगळी व्यवस्था चोखपणे केली जातेय की नाही, यावर लक्ष ठेवून होते. पण ज्याचा उत्सव आहे तो लाडका गणपती बाप्पा मात्र लांब एकाजागी जाऊन बसला होता. हे पाहताच भाऊ कार्तिकेयाने जवळ जाऊन विचारलं, ‘असा का बसलायस... काही अडचण आहे का?’ हे ऐकून बाप्पांचं मुसमुसणं सुरू झालं.
म्हणाले, ‘दादा, या वर्षी मी पृथ्वीवर नाही गेलो तर चालणार नाही का?’ बाप्पांचे हे शब्द ऐकून कार्तिकेय आश्चर्यचकितच झाले. नेहमी तर गणेशोत्सवाला पृथ्वीवर जायचा आतूर असणारा गणेश आता नाही म्हणतोय?.... मग कार्तिकेयाने गणपतीची समजूत काढायला सुरुवात केली; पण गणराय रुसून बसले, काही केल्या ऐकेनात. शेवटी कार्तिकेयाने आई-बाबांच्या कानांवर ही गोष्ट घातली.
हे ऐकून पार्वती आणि शंकर धावतच गणपतीजवळ आले. त्यांना पाहताच बाप्पांचे डोळे भरून आले. म्हणाले, यावर्षी मी उत्सवासाठी नाही जाणार. मग पार्वतीने बाळाला जवळ घेऊन कारण विचारले. त्यावर बाप्पा म्हणाले, आई, माझ्या आगमनासाठी सगळीकडे जोरदार तयारी सुरू असते; मला खूप छान वाटतंय; पण त्या जोरजोरात वाजणाऱ्या साउंड सिस्टीमने अगदी बहिरं व्हायला होतंय. विसर्जनादिवशी तर पळून जावं की काय असे होते. माझी मूर्ती पाहायला भक्त येतात; पण मी मात्र त्या साउंड सिस्टीमच्या भल्या मोठ्या भिंतीमागे अंग चोरून बसलेला असतो. त्या दणदणाटाने छातीत धडधडायला होतं, हादरे बसून माझं आसनच डळमळीत होतं. आता पडतो की काय असं वाटत असतं. कानठळ््या बसत असतात. आता मी भक्तांना आशीर्वाद देत त्यांचा निरोप घ्यायचा की माझ्याच तब्येतीची काळजी करत बसायची, तुम्हीच सांगा? या गाºहाण्यावर पार्वतीमाता निरुत्तर झाली.
मग बाबा शंकरोबा म्हणाले, ‘अरे, पण भक्त तुझे किती लाड करतात! दहा दिवस मस्त पाहुणचार असतो की!’ त्यावर बाप्पा म्हणाले, ‘हो, खरंय; पण यातले अनेक लोक माझ्या नावाचा व्यवसायच चालवतात. आमचाच गणपती नवसाला पावणारा म्हणत लाखोंची उलाढाल सुरू असते. आता मी काय एकाच मूर्तीत असतो का? काही ठिकाणी मांडवाखालीच डाव रंगलेले असतात. त्यांचे नाही ते उद्योग मला उघड्या डोळ््यांनी पाहावे लागतात. दिवसभर एकट्यानेच मांडवात बसून बोअर होतं. ही मंडळी स्वत: गायब होतात आणि माझीच भक्तिगीतं मलाच ऐकवतात. हे बरं, पण पिक्चरची गाणी ऐकायचं म्हणजे... फारच झालं.
तरुण भक्त हाऊसफुल्ल होऊन मिरवणुकीत कसल्या-कसल्या गाण्यांवर नाचत असतात. आता तर शांताबाई, शीला, मुन्नी. ही सगळी गाणी मला पाठ झालीयंत. यावर्षी आणि काय नवीन असेल माहीत नाही. या सगळ्या गोंगाटात जे भक्त पारंपरिक वाद्यांच्या गजरात माझी मिरवणूक काढतात त्यांचे मात्र हाल होतात. विसर्जनानंतर हे लोक माझ्याकडे फिरकत पण नाहीत. दोन दिवसांनी समुद्र, नदी, तलाव, विहिरीचे पाणी तर बदललेले असतेच; पण माझ्याही मूर्तीचे हाल झालेले असतात... या सगळ्या तक्रारींच्या पाढ्यानंतर बाबांनाही काय बोलावे सुचेना.
शेवटी आई-बाबा दोघांनीही गणेश बाळाची समजूत काढली म्हणाले, ‘बाळा, माणसातले चांगले गुण ओळख. तू बुद्धिदाता, सुखकर्ता, दु:खहर्ता आहेस, प्रथम पूज्य आहेस.
तुझ्यानिमित्ताने त्यांच्या घरात सुख-समृद्धी येते, मनातली अढी दूर होते, मंगलमयी सोहळा होतोच; पण अनेकांना रोजगार मिळतो, त्यांच्या आयुष्यातले दहा दिवस तू आपल्या अस्तित्वाने व्यापून टाकतोस. निरागस लहान मुलं तर कित्ती आनंदात असतात... त्यांचे मन तू कसं मोडणार...?’ हे ऐकल्यावर बाप्पांचा मूड बदलला.. हो खरंय, मी जातो पृथ्वीवर; पण एक अट आहे, आल्यावर शीण घालवण्यासाठी पुढे दहा-पंधरा दिवस आराम करणार... आणि रोज आईच्या हातचे मस्त मोदक खाणार...’ ही अट मान्य झाल्यावर बाप्पा उंदरावर बसून पृथ्वीच्या दिशेने निघालेसुद्धा.. इकडे कैलासावर पार्वती आणि शंकरोबांनी मात्र सुटकेला नि:श्वास सोडला....