संपर्काचा ‘दुवा’ साधणार कधी ? एका भागात कामे, तर दुसऱ्या भागाकडे दुर्लक्षचा आरोप

By admin | Published: December 24, 2014 10:40 PM2014-12-24T22:40:41+5:302014-12-25T00:07:59+5:30

रेल्वे ट्रॅकने प्रभागाची विभागणी; स्कायवॉकअभावी खडतर प्रवास----प्रतिबिंब प्रभागाचे प्र.क्र. ३६ टेंबलाई मंदिर

When to contact 'link'? Work in one area, while the other part ignored charges | संपर्काचा ‘दुवा’ साधणार कधी ? एका भागात कामे, तर दुसऱ्या भागाकडे दुर्लक्षचा आरोप

संपर्काचा ‘दुवा’ साधणार कधी ? एका भागात कामे, तर दुसऱ्या भागाकडे दुर्लक्षचा आरोप

Next

एका भागात कामे, तर दुसऱ्या भागाकडे दुर्लक्षचा आरोप

प्रभाग टँकरमुक्त केल्याचा नगरसेवकांचा दावा
कोल्हापूर : प्रभागातून रेल्वे रूळ जात असल्याने एकाच प्रभागाची दोन भागात विभागणी झालेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक ३६, टेंबलाई मंदिर होय. विद्यमान नगरसेवक रसीदली बारगीर यांनी या विभागणीमुळे एका भागात जोरदार कामे केली आहेत, तर दुसऱ्या भागाचा संपर्कच तुटलेला आहे.
टेंबलाईवाडी प्रभागात रुईकर कॉलनीतील त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी, चांदणेनगर, भीमविजय सोसायटी, चव्हाण गल्ली ही उच्चभ्रू नागरिक वस्ती म्हणून ओळखली जाते; तर विक्रमनगरातील नवदुर्गा गल्ली, उत्तर भाग ही मध्यमवर्गीय, तर शाहू कॉलनी झोपडपट्टीत कष्टकरी जनता अशी विभागणी झाली आहे.
प्रभागातून जाणाऱ्या रेल्वे रुळांमुळे प्रभागाचे दोन भाग पडले आहेत. रुईकर कॉलनीत उच्चवर्गीय नागरिक राहतात. या प्रभागात जरी नगरसेवक यांचा संपर्क कमी असला, तरी या ठिकाणी नियमित कचरा उठाव होतो. तसेच येथील गटारीही साफ आहेत. मात्र, उड्डाणपुलाखालून ते लोणार वसाहतीकडे जाणारा जुना विजापूर हायवे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. गेल्या पाच वर्षांपासून नुसती या रस्त्याची डागडुजी केली जाते. याबाबत येथील नागरिक नगरसेवकांकडे वारंवार पाठपुरावा करत आहेत. रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, रेल्वे गुडस्कडे जाण्यासाठी हा सोयीस्कर रस्ता असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून अनेक वेळा अपघात झाले आहेत.
यासह दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ अनेक वर्षांपासून पाण्याची गळती आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने या परिसरात कमी किंवा अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ही गळती न निघाल्याने या भागातील नागरिकांची नाराजी आहे.
टेबलाई मंदिर परिसर, विक्रमनगर येथून अनेक नागरिक कामानिमित्त, तर शाळकरी मुले शाळेसाठी रुईकर कॉलनीत येतात. रेल्वे रुळावर उड्डाणपूल नसल्याने या सर्वांना वीस फूट खोल खाली उतरून व पुन्हा वीस फूट खोल वर चढून जावे लागते. अनेक वर्षांपासून रेल्वे रुळावर उड्डाणपूल किंवा स्कॉय वॉक व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत. या ठिकाणी पूल बांधण्याचे कामही सुरू झाले होते. मात्र, घोडे कशात अडले हे कोणालाच कळाले नाही. प्रभागाच्या एका भागात मात्र विद्यमान नगरसेवकांनी जोरदार कामे केली आहेत. अंतर्गत रस्ते, टेंबलाई मंदिर ते विक्रमनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. तसेच विक्रमनगर ते महाजन हॉल, शाहू कॉलनी, नवदुर्ग कॉलनी येथे जलवाहिनी टाकली आहे. त्यामुळे भागातील पाणी समस्या कमी केली आहे. चार वर्षांत त्यांनी एकदाही टँकर भागात मागविलेला नाही.


३० फूट पुलाअभावी ३ कि.मी.चा फेरा
विक्रमनगर, टेंबलाई परिसरातील अनेकजण काम, शिक्षण, आदींसाठी रुईकर कॉलनीत येतात; पण रेल्वे ट्रॅकवर उड्डाणपूल नसल्याने काही फुटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना तीन कि.मी.चा फेरा मारावा लागतो. उड्डाणपूल झाल्यास हा फेरा वाचेल.
लुटमारीचा धोका
जुना विजापूर हायवेची दयनीय अवस्था झाली असून, या मार्गावर चांगली वर्दळ असते; पण आडवळणी रस्ता आणि विजेच्या खांबाचा अभाव असल्यामुळे रात्री हा परिसर धोकादायक ठरतो. याठिकाणी लुटमारीच्या घटना घडल्या आहेत.



विद्यमान नगरसेवक : रसीदली बारगीर
प्रमुख समस्या
उचगाव, रेल्वे गुडस्कडे जाणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे
रस्त्यावर विजेचे खांब नाहीत
उच्चभ्रू वसाहतीत नगरसेवकांचा संपर्क कमी
पाणी गळतीची समस्या कायम


विकासकामांचा दावा
टेंबलाई मंदिरासाठी ३० लाखांचा निधी
अंतर्गत रस्ते, भाविकांसाठी ग्रील
साडेचार कोटींची विकासकामे
पाणी समस्या सोडविल्याने प्रभाग टँकरमुक्त केल्याचा दावा

उड्डाणपूल ते मार्केट यार्ड
या रस्त्याचे
गेल्या पाच वर्षांपासून अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. या मार्गावरून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ उडून परिसरातील घरांत बसत आहे. या मार्गावर नगरसेवकांनी लक्ष घालून हे काम मार्गी लावावे.
- आनंदराव पाटील

विक्रमनगर, टेंबलाईवाडी येथून अनेक विद्यार्थी, कामगार व नागरिक कामानिमित्त रुईकर कॉलनीकडे येण्यासाठी दररोज त्यांना या रेल्वेरुळांवरून प्रवास करावा लागतो. हा जीवघेणा प्रवास थांबविण्यासाठी अनेक वर्षांपासून या ठिकाणी स्कॉयवॉक किंवा ओव्हरब्रिज बांधावा.
- संजय पवार-वाईकर

पाणी समस्या सोडविल्यामुळे प्रभाग टँकरमुक्त झाला आहे. चार वर्षांत भागात ४.५ कोटींची कामे केली आहेत. अजूनही कामे प्रलंबित आहेत. त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. रुईकर कॉलनी या भागात वैयक्तिक दुर्लक्ष झाले आहे. मात्र, या उड्डाणपूल ते लोणार वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल.
- रसीदली बारगीर, नगरसेवक

Web Title: When to contact 'link'? Work in one area, while the other part ignored charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.