कत्तलखान्याला मुहूर्त कधी ?
By Admin | Published: February 14, 2017 12:36 AM2017-02-14T00:36:20+5:302017-02-14T00:36:20+5:30
निर्णय होऊन तीन वर्षे उलटली : प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात नाही
भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर
पर्यावरणाला हानीकारक ठरणारे शहरातील वेगवेगळ्या भागातील कत्तलखाने बंद करून एकाच ठिकाणी परंतु अद्यावत असा कत्तलखाना उभा करण्याचा निर्णय होऊन तब्बल तीन वर्षे होऊन गेली तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. महानगरपालिकेच्या मागच्या दोन अंदाजपत्रकात असा कत्तलखाना ‘बीओटी’वर उभारण्याचे आश्वासन दिले गेले, एवढेच नाही तर ठेकेदार निश्चित केल्यानंतरही काम जागच्या जागीच राहिले आहे. त्यामुळे उघड्यावरच जनावरे कापण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सदर बाजार येथे मोठ्या जनावरांचा तर बापट कॅम्प येथे छोट्या जनावरांचा कत्तलखाना आहे. त्यातील सदर बाजारातील कत्तलखाना नागरिकांच्या तक्रारीमुळे बंद करण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने मूलभूत कर्तव्यात मोडणारा अद्यावत कत्तलखाना उभारण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला. सुमारे वीस कोटींची भांडवली गुंतवणूक असलेला आणि पर्यावरणाला हानी न पोहोचविणारा हा कत्तलखाना उभारण्यासाठी मुंबईस्थित डी. डी. मरिन एक्स्पोर्टस् या ठेकेदाराची निवड करण्यात आली. हा कत्तलखाना उभारत असताना त्यातून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया करून उद्यानाकरीता वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्याकरीता अद्ययावत असे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही तेथे उभारले जाणार आहे. त्याचबरोबर त्यातून कोणतीही वस्तू बाहेर न टाकता त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. कत्तलखाना संपूर्णपणे सेंट्रल चिलिंग असणार आहे. पर्यावरण जपण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या मूलभूत कर्तव्यात अशी सुविधा देण्याचे बंधन असताना पालिका प्रशासनास एक रुपयांचाही खर्च नाही. ठेकेदार कटिंगचे शुल्क आकारणार असून ठेकेदाराने महापालिकेला वर्षाला २० लाख रुपये शुल्क द्यायचे आहे. पुढे प्रत्येक वर्षी त्यामध्ये पाच टक्के वाढवून द्यायचे आहेत. प्रकल्प उभारून तीस वर्षे चालवायचा आहे. त्यामुळे महापालिकेचे कसलेच नुकसान होणार नाही तरीही हा प्रकल्प रखडला आहे. (प्रतिनिधी)