प्राणीमित्रांनी बैलजोडी कधी सांभाळली?
By Admin | Published: January 8, 2016 11:48 PM2016-01-08T23:48:48+5:302016-01-09T00:38:20+5:30
सदाभाऊ खोत : राजू शेट्टी संसदेतही बैलगाडी शर्यत बंदी उठविण्याचा कायदा संमत करतील
सांगली : आलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना गावाकडील शेतकरी कशा पद्धतीने बैलांवर प्रेम करतात, हे कसे कळणार? प्राणीमित्रांनी बैलजोडी संभाळली असती, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळले असते. मग त्यांनी बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी कधीच केली नसती, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा वटहुकूम काढला असून, सहा महिन्यात संसदेत तो संमत होणार आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी देशातील खासदारांना एकत्र करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा संमत करून घेतील, असेही खोत यांनी सांगितले.
ते म्हणाले की, खिलार गाई व बैलांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर बैलगाडी शर्यती चालू राहिल्या पाहिजेत, या मागणीसाठी आम्ही २०१२ पासून राज्यभर आंदोलने केली आहेत. खासदार शेट्टी यांनीही या शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी संसदेत केली होती. आताही आम्ही आळंदी येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता. मात्र, शासनाने त्यापूर्वीच शर्यतीवरील बंदी उठविल्यामुळे, आळंदी येथे विजय मेळावा साजरा करणार आहोत.
केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा राज्यसभा व लोकसभेमध्ये संमत झाला पाहिजे. त्यादृष्टीने खासदार शेट्टी देशातील खासदारांना बैलगाडी शर्यतींचे शेतकऱ्यांच्यादृष्टीने किती महत्त्व आहे ते पटवून देतील. त्यामुळे दोन्ही सभागृहांत हा कायदा संमत होऊन कायदेशीरदृष्ट्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यास मदत होणार आहे. या निर्णयाविरोधात आता तरी प्राणीमित्रांनी कुरघोड्या करू नयेत. त्यांनी बैलगाडी शर्यत बंदीची मागणी करण्यापूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत, असेही खोत म्हणाले. (प्रतिनिधी)
समाजसेवकांचा देशभर सुळसुळाट
काखेत शबनम बॅग अडकविली की लगेच समाजकारणी झालो, असा आव आणणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे. या समाजसेवकांचा देशभर सुळसुळाट झाला आहे. आलिशान बंगल्यात राहायचे, शेती करायची नाही, पशुधन सांभाळायचे नाही पण, त्यांच्या व्यथा आम्हालाच खूप कळतात, असा आव मात्र आणायचा. गावगाडा कसा चालतो, हेही त्यांना माहीत नसते. यांच्या अशा भूमिकेमुळेच खिलार जनावरे संपण्याच्या मार्गावर आहेत, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी प्राणीमित्रांवर केली.