महापुरातील घरांची पायाभरणी कधी? : अद्याप सरकारकडून निधी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:17 PM2019-11-22T12:17:17+5:302019-11-22T12:19:20+5:30
अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टीने आलेल्या महापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासन व केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल सप्टेंबर महिन्यातच पाठविला असून, अद्याप यातील एक रुपयाही नुकसानग्रस्ताला मिळालेला नाही. त्यामुळे महापुरातील नुकसानग्रस्तांच्या घरांच्या पायाभरणी कधी होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजून अनेक घरे पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरे जमीनदोस्त झाली, तर काही मातीची घरे पाऊस कमी होऊन पडेल तशी ढासळू लागली. घरेच कोसळल्याने पूरग्रस्तांना निवाराच राहिला नाही. त्यामुळे ते पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याचे चित्र आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात या अहवालाला अंतिम स्वरूप देऊन तो पुन्हा शासनाला पाठविला. त्यानुसार पूर्णत: घरे पडलेल्यांसाठी प्रत्येकी ९५ हजार १०० रुपयांप्रमाणे ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे; तर पूर्णत: पडलेल्या ६४ झोपड्यांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे तीन लाख ८४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
अंशता पडलेल्या पक्क्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक कोटी २६ लाख रुपये व अंशत: पडलेल्या कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या राष्टÑीय आपत्ती निवारण निधीतून हा निधी जिल्हा प्रशासनाने मागितला आहे. यानंतर अपेक्षित नुकसानीची मदत येणे अपेक्षित होते.; परंतु यातील एक छदामही पुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना मिळालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या घरांची पायाभरणी होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्ह्यातील १६ हजार घरांचे पूर्णत: नुकसान
महापुराने जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ५७८ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यासाठी ११० कोटी ८५ लाख ७० हजारांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये पूर्णत: पडलेल्या घरांची संख्या १६ हजार ६४२ इतकी असून त्याकरिता ९१ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. एकूण ६४ झोपड्या जमीनदोस्त झाल्या असून, त्यासाठी ३ लाख ८४ हजार रुपये, अंशत: पडलेल्या घरांची संख्या २११४ इतकी असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख ८४ हजार, अंशत: पडलेल्या २९७५८ कच्च्या घरांसाठी १७ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये मदतीची मागणी करण्यात आली आहे.
महापुरातील पाण्याने पडलेल्या घरांसंदर्भात अंतिम अहवाल गतमहिन्यात राज्य शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये सुमारे ४१ हजार घरांच्या नुकसानीसाठी संबंधितांना ११० कोटी ८५ लाख ७० हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच ही मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
- भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी