आरोग्य विभागाला जेव्हा जाग येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:14 PM2017-09-28T16:14:00+5:302017-09-28T16:17:18+5:30
कोणतेही पुरस्कार हे वेळच्यावेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पध्दतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून आता तीन वर्षांचे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार देण्यासाठीची तयारी या विभागाने सुरू केली आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर, 28 : कोणतेही पुरस्कार हे वेळच्यावेळी दिले गेले तर त्याची गोडी अधिक असते. मात्र महाराष्ट्र शासनाचे अनेक विभाग शक्यतो घाऊक पध्दतीनेच पुरस्कारांचे वितरण व्हावे या भूमिकेत असतात हे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. आरोग्य विभागही याला अपवाद नसून आता तीन वर्षांचे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार देण्यासाठीची तयारी या विभागाने सुरू केली आहे.
दहा वर्षांपूर्वी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावे आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण अथवा उपजिल्हा रूग्णालय पुरस्कार देण्याची योजना सुरू केली. आदिवासी क्षेत्रातील आरोग्य संस्था आणि खाजगी संस्थांनाही या योजनेतून पुरस्कार देण्यात येतात.
तसेच खाजगी स्त्री डॉक्टर, पुरूष डॉक्टर, शासकीय स्त्री आणि पुरूष डॉक्टर, आदिवासी विभागातील डॉक्टर यांनाही वैयक्तिक २५ हजार रूपयांचे पुरस्कार देण्यात येतात. महाराष्ट्राच्या अवाढव्य आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगले काम करणारे डॉक्टर आणि संस्थांना यातून प्रोत्साहन मिळावे या हेतूने या पुरस्कार योजनेची सुरूवात करण्यात आली.
मात्र गेली दोन वर्षे या पुरस्कारांचे वितरणच केले गेले नाही. मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्यापासून ते वेगवेगळी कारणे सांगत या आरोग्य संस्थांना आणि डॉक्टरांना पुरस्कार देणेच राहून गेले आहे. आता यंदा आरोग्य विभागाला एकदम जाग आली असुन २0१५/१६, २0१६/२0१७ आणि यंदाचा २0१७/२0१८ या तीन वर्षांच्या पुरस्कारांचे एकदमच वितरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
२६ सप्टेंबर रोजी शासनाने आदेश काढून यासाठीच्या परीक्षण समितीची व त्यातील अशासकीय सदस्यांचीही निश्चित केली आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाºयांबरोबरच डॉ. ए. पी. खाडे, डॉ मधुसुदन कर्नाटकी, डॉ. गो. सी. चिंधे आणि विलास देशपांडे यांचा या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
२0 लाखांचे पुरस्कार आणि ९८ लाखांचे बजेट
या तीन वर्षांचे रोख रकमेचे पुरस्कार देण्यासाठी सुमारे २0 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र याचा योजनेची माहिती देण्यापासून ते पुरस्कार वितरण समारंभापर्यंतचा सर्व खर्च एकत्रित करता ते एकूण बजेट ९८ लाख रूपयापर्यंत पोहोचले आहे. २0 लाखांचे पुरस्कार आणि ते वितरित करण्यासाठी आणि स्पर्धा घेण्यासाठी ८0 लाख रूपये खर्च असे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.