महावितरण’ची गाडी निकम यांना शोधत जाते तेव्हा...!
By admin | Published: June 14, 2015 01:51 AM2015-06-14T01:51:54+5:302015-06-14T01:51:54+5:30
‘‘लोकमत’ इफेक्ट : वीज कंपनीची यंत्रणा हादरली, शनिवारी सुटी असूनही अधिकारी कार्यालयात; वीज कनेक्शन आठ दिवसांत जोडणार
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
‘लोकमत’मध्ये आलेल्या एखाद्या बातमीची दखल किती तत्परतेने घेतली जाते, याचाच अनुभव सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील शेतकरी सदाशिव दिनकर निकम यांना शनिवारी आला. पैसे भरूनही त्यांना तब्बल २२ वर्षे कनेक्शन मिळाले नसल्याचे वृत्त शनिवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ‘महावितरण’ची गाडी निकम यांना शोधत त्यांच्या गावी गेली. त्यांना मेढा येथे आणून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेतली व आठ दिवसांत कनेक्शन जोडण्याची ग्वाही बारामती झोनचे मुख्य अभियंता रामराव मुंढे यांनी दिली. इतकी वर्षे रखडलेले काम इतक्या जलदगतीने होणार म्हटल्यावर निकम यांना भरून आले.
सदाशिव निकम हे करंदी गावचे अल्पभूधारक शेतकरी. त्यांनी पहिल्यांदा १९९३ ला वीज कनेक्शनसाठी १९१० रुपये भरले. तो अर्ज निकाली निघाला म्हणून नव्याने पैसे भरा म्हणून सांगितल्यावर त्यांनी पुन्हा १२ आॅक्टोबर २०११ रोजी ३०२५ रुपये भरले. पहिल्या अर्जाची अनामत रक्कम त्यांना आजही मिळालेली नाही. दोन अर्ज करून त्यासाठी अनामत भरूनही त्यांना कनेक्शन मिळत नव्हते. अनेक वेळा हेलपाटे मारूनही महावितरणचे अधिकारी ‘आता तुमचाच नंबर बघा,’ असे आश्वासन देत; परंतु प्रत्यक्षात कनेक्शन काही जोडत नव्हते. त्यासंबंधीची व्यथा निकम यांनी ‘लोकमत’कडे मांडली. शनिवारी त्याचे वृत्त प्रकाशित होताच वीज कंपनीची यंत्रणा हादरली. दुसऱ्या शनिवारची सुटी असूनही मेढ्याचे उपकार्यकारी अभियंता वैभव थोरवडे व कनिष्ठ अभियंता सी. आर. महाडिक कार्यालयात आले. गावातील वायरमनद्वारे निकम यांना भेटायला या, असा निरोप दिला. त्यांच्याकडे वाहनाची सोय नव्हती म्हटल्यावर वायरमनला ‘वाहन करून त्यांना घेऊन या,’ असे सांगण्यात आले. त्यानुसार वायरमन त्यांना घेऊन मेढा येथे गेला. तिथे त्यांच्याकडून पूर्वीच्या वायरमनने एक हजार रुपयांची लाच घेतल्याचे लेखी लिहून घेतले व ट्रान्सफॉर्मर बसवून तातडीने कनेक्शन देण्याची ग्वाही देण्यात आली.
मुख्य अभियंता रामराव मुंढे यांनी ‘लोकमत’ला सांगितले,‘निकम यांची व्यथा मी वाचल्यावर सकाळीच मेढ्याचे उपअभियंता थोरवडे यांना तातडीने कनेक्शन देण्याचे आदेश दिले आहेत. निकम यांना कनेक्शन मंजूर आहे; परंतु त्यांचे क्षेत्र गावठाणजवळ आहे. शेतीपंपाचे कनेक्शन असल्याने दुसऱ्या फीडरवरून ते द्यायला हवे होते. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवायला लागत होता. तो बसविण्यासाठी नेमलेल्या सांगलीच्या पाटील एजन्सीने हे काम वेळेत न केल्याने कनेक्शन देण्यास विलंब झाला; परंतु आता मागे काय झाले याची कारणे न सांगता पहिल्यांदा त्यांचे कनेक्शन जोडावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार शक्य तितक्या लवकर कनेक्शन जोडले जाईल.’