मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, चंद्रकांत पाटील एकत्र येतात तेव्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 03:22 PM2021-06-26T15:22:05+5:302021-06-26T15:31:15+5:30
Politics Kolahpur : सरकारमधील काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शनिवारी काही वेळ एकत्र होते. या तिघांमध्ये कोरोना, लॉकडाऊन आणि अधिवेशन या विषयावर दिलखुलास चर्चा रंगली. चर्चेवेळी सत्ताधारी मंत्री आणि आमदार पाटील यांनी एकमेकांचे हळूवार चिमटे काढले.
कोल्हापूर : सरकारमधील काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शनिवारी काही वेळ एकत्र होते. या तिघांमध्ये कोरोना, लॉकडाऊन आणि अधिवेशन या विषयावर दिलखुलास चर्चा रंगली. चर्चेवेळी सत्ताधारी मंत्री आणि आमदार पाटील यांनी एकमेकांचे हळूवार चिमटे काढले.
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथे राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी हे तिघेजण शनिवारी आले होते. सकाळी साडेसातला लक्ष्मी विलास पॅलेस येथे पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव व सरकारी अधिकारी उपस्थित होते. हे सर्वजण खासदार संभाजीराजे छत्रपती यांची वाट पाहत होते.
यादरम्यान, चंद्रकांत पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात कोरोना, लॉकडाऊन यांच्यात चर्चा सुरू झाली. यावर मंत्री मुश्रीफ यांनी शहर, जिल्ह्यात ७० टक्केपेक्षा अधिक जणांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आणि सर्व व्यवहार खुले करायचे, असे सूचवले. निर्बंधास व्यापारी, व्यावसायिक वैतागले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारने ऑनलाईनपणे पूर्ण दिवस अधिवेशन घ्यावे, असे मत मांडले. असे झाल्यास विरोधकांना प्रश्न विचारता येईल आणि सत्ताधाऱ्यांना उत्तरही देता येईल, असे ते म्हणाले. यावर पालकमंत्री सतेज पाटील अशाप्रकारे अधिवेशन
घेतल्यास नियंत्रण ठेवणे अडचणीचे होईल, असे सांगितले. अशी सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा रंगली असतानाच खासदार संभाजीराजे यांचे आगमन झाले.
सर्वजण राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. मात्र मराठा आरक्षण, ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या मुद्यावरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते आणि सत्ताधारी आघाडीतील दोन मंत्री एकत्र येत संयमाने , दिलखुलास केलेली चर्चा लक्षवेधी ठरली.