परीक्षा संचालक निवडीचा मुहूर्त कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:25+5:302020-12-07T04:19:25+5:30
परीक्षा मंडळाच्या नवीन संचालक निवडीची प्रक्रिया विद्यापीठाने एप्रिल २०१९ मध्ये सुरू केली. त्याअंतर्गत दाखल झालेल्या १६ अर्जांच्या छाननीची प्रक्रिया ...
परीक्षा मंडळाच्या नवीन संचालक निवडीची प्रक्रिया विद्यापीठाने एप्रिल २०१९ मध्ये सुरू केली. त्याअंतर्गत दाखल झालेल्या १६ अर्जांच्या छाननीची प्रक्रिया झाली. मात्र, पुढील कार्यवाही थांबली. त्यानंतर वर्षभरानंतर दि. २१ जुलै रोजी विद्यापीठाने मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी पात्र आणि अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यात महेश काकडे, अर्जुन घाटुळे, सुहास पाटील, शिवाजी मुंडे, योगेश पाटील, सुजाता आडमुठे हे मुलाखतीसाठी पात्र, तर उर्वरित दहाजणांचे अर्ज अपात्र ठरले. माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांचा कार्यकाळ दि. १८ जूनला संपला. त्यानंतर हे पद रिक्त आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी या पदाच्या निवडीच्या दृष्टीने काही हालचाली झाल्या आहेत. त्यात या पदासाठी इच्छुक असणाऱ्या प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रवीण चौगुले, व्ही. एम. पाटील, आर. आर. कुंभार, मंगलकुमार पाटील यांचे बायोडाटा (परिचयपत्र) विद्यापीठ प्राचार्य संघटनेने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सादर केले आहेत. विद्यापीठाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या परीक्षा संचालक, प्र-कुलगुरू पदांच्या निवडीची प्रक्रिया लवकर होणे आवश्यक आहे.
चौकट
निवडीच्या घाईवर प्रश्नचिन्ह
माजी कुलगुरू डॉ. शिंदे यांचा कालावधी संपण्यास एक वर्षाचा अवधी असताना परीक्षा मंडळाच्या संचालक निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. शिंदे यांचा कालावधी संपल्यानंतर जुलैमध्ये नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू असताना मध्येच विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षा संचालक निवडीची प्रक्रिया घाईने सुरू केली. त्यावर विद्यापीठाच्या घटकांची मते जाणून घेऊन ‘लोकमत’ने या निवडीच्या घाईबाबत प्रश्न उपस्थित केल्याने प्रशासनाने संबंधित प्रक्रिया थांबविली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुलाखतीची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे त्यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले होते; पण अद्यापही तारीख जाहीर झालेली नाही.