अंबाबाई मंदिर दर्शन मंडपाचा मुहूर्त कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 04:37 PM2019-08-01T16:37:39+5:302019-08-01T16:39:39+5:30
कोल्हापूर : जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत ७ कोटींचा निधी येऊनही अद्याप दर्शन मंडप उभारण्यात ...
कोल्हापूर : जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत ७ कोटींचा निधी येऊनही अद्याप दर्शन मंडप उभारण्यात येणाऱ्या जागेचा ताकतुंबा सुरू आहे. या निधीचा वापर आपल्या मालकीसारखा व हेकेखोरपणाने न करता प्रशासनाने लक्ष घालून तातडीने दर्शन मंडप उभारावा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य शासनाने अंबाबाई मंदिराचा ८६ कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा जाहीर केला. शिवसेनेच्या आंदोलनाने त्याला गती येऊन प्राथमिक विकासकामासाठी प्रशासनाकडे दर्शन मंडप व इतर सुविधांसाठी सात कोटींचा निधी वर्ग झाला आहे; मात्र सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व काही पदाधिकाऱ्यांमुळे दर्शन मंडपाची जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
निवडणुका तोंडावर असताना जागेचा ताकतुंबा चालू आहे. वास्तविक वार्षिक सण असो अथवा नवरात्रौत्सव या कालावधीत भाविकांना ऊन, वारा, पाऊस यांपासून कोणतेही संरक्षण नाही. लहान-थोर, वृद्ध आणि अनेकांची यात ससेहोलपट होत आहे. अब्जावधी रुपयांचे उत्पन्न असणाऱ्या समितीने यावर आजपर्यंत काहीही ठोस निर्णय घेतलेला नाही; त्यामुळे आता प्रशासनानेच या दिरंगाईच्या कामात त्वरित लक्ष घालावे व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी युद्ध पातळीवर निर्णय घेऊन दर्शन मंडपाचे काम त्वरित सुरू करावे. दरम्यान, सरलष्कर भवनशेजारील महापालिकेच्या जागेत व्यवसाय करणाºया सात दुकानदारांनी दर्शन मंडपासाठी आम्हाला हलविण्यात येऊ नये, अशी विनंती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली आहे.
जशास तसे..
दोन दिवसांपूर्वी भाजपच्या मेळाव्यात देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेने लगेच देवस्थान समितीकडील प्रलंबित कामावर बोट ठेवून जाब विचारला आहे.