घनकचऱ्यावर प्रक्रिया कधी?
By admin | Published: April 19, 2015 01:09 AM2015-04-19T01:09:06+5:302015-04-19T01:09:06+5:30
विभागीय आयुक्तांची आयुक्तांना विचारणा : पंचगंगा प्रदूषण प्रश्नी घेतला आढावा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत १६५ टन नागरी घनकचरा प्रतिदिन निर्माण होतो. या घनकचरा निर्मितीवर प्रक्रिया कधी करणार, असा प्रश्न आयुक्त पी. शिवशंकर यांना करून या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शनिवारी येथे दिल्या.
पंचगंगा प्रदूषणासंदर्भात कोल्हापूर महानगरपालिका, इलचकरंजी नगरपालिका, औद्योगिक वसाहती, जिल्हा परिषद, निरी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
चोक्कलिंगम यांनी १६५ टन नागरी घनकचरा प्रतिदिन निर्माण होतो. या घनकचरा निर्मितीवर प्रक्रिया कधी करणार, असा प्रश्न महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना विचारून लवकर तोडगा काढावा, अशी सूचना केली. महानगरपालिकेच्या हद्दीतील ३५ टक्के क्षेत्रात भुयारी गटारे नाहीत त्याबाबतचेही नियोजन तत्काळ करावे. यासाठी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी भूसंपादनामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधितांची बैठक घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाने न्यायालयाच्या आदेशान्वये कोणती कार्यवाही सुरू केली आहे. ‘निरी’ने केलेल्या शिफारशींचे पालन कसे केले जात आहे. जनजागृती कशी केली जात आहे. पंचगंगा प्रवाहित ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत. सांडपाणी व मैला, घनकचरा, जैव वैद्यकीय कचरा, द्रवकचरा यांच्यावरील प्रक्रिया व व्यवस्थापन, आदी बाबींचा सविस्तर आढावा चोक्कलिंगम यांनी यावेळी घेतला.
इचलकरंजी नगरपालिकेने प्रतिदिन १०० टन निर्माण होणाऱ्या नागरी घनकचरा यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न करावेत. शहरात अद्यापही ४० टक्के क्षेत्रात भुयारी गटारे नाहीत ती आॅगस्टपर्यंत पूर्ण करून घ्यावीत. तसेच जे प्रोसेसिंग युनिट पंचगंगेत थेट सांडपाणी मिसळतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या. (प्रतिनिधी)