रायगडाला जेव्हा जाग येते नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 03:56 PM2020-07-24T15:56:41+5:302020-07-24T16:00:15+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता.
अभिनेते अविनाश देशमुख आणि मोहन जोशी यांनी १९८४ मध्ये सीमांत या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि ५ मार्च १९८४ रोजी कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ह्यरायगडाला जेव्हा जाग येतेह्ण या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग केला. या नाटकाचे अनेक प्रयोग शहरात आणि ग्रामीण भागांत झाल्याची आठवण ७८ वर्षीय ज्येष्ठ नाट्यवितरक शशिकांत रंगनाथ जोशी यांनी सांगितली.
या नाटकात कोणत्याही पात्राच्या कमरेला तलवार नव्हती, हे आणखी वैशिष्ट्य होते. १९६२ साली प्रथमत: रंगभूमीवर आलेले हे नाटक १९६४ मध्ये वेगळ्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न अविनाश देशमुख यांनी केला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. या नाटकात शिवाजी साकारतानाच इथे ओशाळला मृत्यू या नाटकात अविनाश देशमुख यांनी औरंगजेबही साकारला होता.
बादशाही लॉजमध्ये मुक्काम
रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचे सुमारे ३५ प्रयोग कोल्हापुरात झाले. ज्या ज्या वेळी इथे प्रयोग झाले, त्या त्या वेळी अविनाश देशमुख पत्नी स्वाती, मुलासह शशिकांत जोशी यांच्या बादशाही लॉजमध्ये मुक्काम करीत, अशी आठवण जोशी यांनी सांगितली. या नाटकात त्यांचे संपूर्ण कुटुंबच काम करीत होते. इतर कलाकारांसारखे नखरे त्यांनी कधी केले नाहीत, असेही जोशी म्हणाले.
ग्रामीण भागांतील नाट्यप्रयोगांना प्रतिसाद
ज्येष्ठ नाट्यवितरक कै. प्रफुल्ल महाजन आणि आनंद कुलकर्णी यांच्यासोबत अविनाश देशमुख यांनी अनेक प्रयोग केले. विशेषत: हातकणंगले, उत्तूर, पेठवडगाव येथे झालेल्या प्रयोगांना विशेष प्रतिसाद लाभल्याची माहिती गिरीश कुलकर्णी यांनी सांगितली. या नाटकासोबत त्यांनी इतरही अनेक नाटकांचे प्रयोग जिल्ह्यात केल्याची आठवण कुलकर्णी यांनी सांगितली.