शिरोळला नदी प्रदूषणातून मुक्ती केव्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:04 AM2018-05-07T00:04:49+5:302018-05-07T00:04:49+5:30
संदीप बावचे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेल्या अनेक वर्षांपासून नदीक्षेत्रात वाढलेले औद्योगीकरण, शहरातील सांडपाणी यामुळे वरदान ठरलेली पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी शाप ठरली आहे. नदी प्रदूषणावर प्रत्येक वर्षी आंदोलने होत असतात, जनहित याचिका दाखल झाली आहे. मात्र, लोकांच्या जिवावर उठलेले पाणी प्रदूषणाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघाला नाही. वारणेचे पाणी इचलकरंजीकरांना देणार नाही, यानिमित्ताने पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता तरी पंचगंगा प्रदूषणमुक्त होणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पंचगंगा नदीमुळे शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, शिरढोण, तेरवाड, कुरुंदवाड, शिरोळसह सुमारे तेवीस गावे ओलिताखाली आली. त्यामुळे शेती हिरवाईने नटली. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र, बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे काठावरील गावांत औद्योगिक क्षेत्र वाढले अन् कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत औद्योगीकरणाचे, शहरातील सांडपाण्याचे पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत गेला. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे नदीपात्रातील पाणी स्वच्छ करणारे नैसर्गिक जलचर प्राणी नाश पावत असल्याने पाणी प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. जलपर्णीने पंचगंगा नदी व्यापून गेली, असे चित्र दिसत आहे.
वाहून येणारे प्रदूषित पाणी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ व तेरवाड या शेवटच्या बंधाºयावर येऊन तटत असल्याने याचा फटका या तालुक्यालाच बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम तर होत आहेच, शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पिकाऊ जमीन नापीक बनत आहे. त्यामुळे शेतकरीही नापीक शेतीमुळे बेकार बनत आहेत. वारणा बचावच्या निमित्ताने पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी प्रत्येक गावात सांडपाणी प्रकल्प उभारण्याची गरज आहे.
वारणेसाठी नागरिकांची वज्रमूठ
इचलकरंजीच्या अमृत योजनेला वारणेतून एक थेंबही पाणी देणार नाही यासाठी दानोळीसह वारणाकाठच्या गावांनी लढा सुरू केला आहे. गेल्या चौदा महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने वारणाकाठच्या शेतकºयांनी जनजागृती सुरू केली आहे. इचलकरंजी पालिकेने पोलीस बळाचा वापर करून दानोळी येथे वारणा योजनेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकीच्या बळावर दानोळीकरांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वारणेच्या पाण्यावरून मोठा संघर्ष सुरू झाला आहे. शिरोळ तालुक्यासह वारणाकाठाकडून आंदोलनासाठी वज्रमूठ बांधली जात आहे.
नदी प्रदूषणाचे विष
रसायनयुक्त दूषित पाणी थेट पंचगंगेबरोबर कृष्णा नदीत मिसळत असल्याने दरवर्षी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. सांगलीकडून येणाºया दूषित पाण्याचा फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे. कॅन्सरसारख्या भयावह रोगाने तालुक्याला ग्रासले आहे. त्यामुळे शासनाने नदी प्रदूषणमुक्तीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून होत आहे.
दानोळीकरांचे इचलकरंजीला बळ
इचलकरंजी नगरपालिकेने पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाले म्हणून मजरेवाडीतून कृष्णेची पाणी योजना राबविली, तर शहरासाठी तिसरी पाणी योजना म्हणून शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील वारणा नदीतून राबविली जाण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, वारणा बचाव कृती समितीने वारणेतून योजना राबविण्यापेक्षा पंचगंगा प्रदूषणमुक्त करावी यासाठी वारणाकाठचे पाठबळ असेल, अशी भूमिका घेतली.