पाच हजारांची लाच घेताना दोघे जाळ्यात
By Admin | Published: February 28, 2015 12:26 AM2015-02-28T00:26:26+5:302015-02-28T00:26:38+5:30
कनिष्ठ अभियंत्याचा समावेश : ‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची कारवाई
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील महापालिकेच्या हद्दीत असलेल्या जागेच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचा कनिष्ठ अभियंता संशयित मिलिंद जनार्दन पाटील (वय ३५ रा. शासकीय विश्रामगृहाजवळ, ताराबाई पार्क, मूळ राहणार चिंचणी-वांगी ता. कडेगांव जि. सांगली) याला व संशयित मिलिंद केरबा वावरे (२५ रा. कसबा बावडा) या दोघांना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी अटक केली.
संशयित मिलिंद वावरेला राजारामपुरी जनता बझार येथील विभागीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. वावरेने मिलिंद पाटील याच्या सांगण्यानुसार लाच घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पाटीललाही पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, उचगांव परिसरातील तक्रारदाराच्या वडिलांनी जागा घेतली आहे. तक्रारदार मूळ सौदलगा-निपाणी परिसरातील रहिवासी असून ते सध्या वकिली करतात. उचगाव येथील जागेवर घर बांधण्याकरिता तक्रारदारांचे वडील राजारामपुरी कार्यालयात कागदपत्रांची फार्ईल घेऊन गेले. त्याठिकाणी तेथील लिपीक देसाई यांनी फाईल पाहून ‘तुमच्या अभियंत्यांच्या परवान्याची मुदत संपली आहे. तुम्ही मिलिंद वावरे यांना भेटा,’असे सांगितले. त्याप्रमाणे ते वावरेला भेटले.
‘माझ्या अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत. तुमचे काम मी करून देईन. परंतु, महापालिकेतील अधिकाऱ्यांना देण्यासाठी माझ्याकडे ११ हजार रुपये द्यावे लागतील,’असे वावरेने त्यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी चलनाने रक्कम भरून ती फाईल वावरे यांच्यामार्फत ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयात दाखल केली.
दरम्यान, गुरुवारी (दि. २६) याबाबत तक्रारदाराने समक्ष लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात येऊन तक्रार दिली. ‘शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी तुमच्या प्लॉटचा सर्व्हे करण्यासाठी
येणार आहेत,’ असे वावरेने फोन करून तक्रारदारांना सांगितले. त्यावेळी ठरल्या ११ हजार रुपयांपैकी ५ हजार रुपये अॅडव्हान्स द्या, असे तक्रारदारास त्याने सांगितले. त्यानुसार राजारामपुरी विभागीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये मिलिंद वावरेला दुपारी तक्रारदारांकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. कारवाईत पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे, अमर भोसले, मनोहर खणगांवकर आदींनी भाग घेतला