Shahu Mill: नको पुन्हा बंद, शाहू मिल ठेवा बुलंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:20 PM2022-05-20T12:20:10+5:302022-05-20T12:20:32+5:30
वास्तूला पुन्हा टाळे लावण्याऐवजी शाहू स्मारक आराखड्याचे काम सुरू होईपर्यंत ही वास्तू भाडेतत्वावर देणे गरजेचे आहे. वास्तूची दुर्दशा होण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, मेळावे, प्रदर्शन, नाट्य-नृत्यांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांना दिल्यास वास्तूची देखभाल तर होईलच; पण उत्पन्नदेखील मिळणार आहे.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : कोल्हापूरच्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक शाहू मिलमधील उपक्रम संपले की वास्तूला पुन्हा टाळे लावण्याऐवजी शाहू स्मारक आराखड्याचे काम सुरू होईपर्यंत ही वास्तू भाडेतत्वावर देणे गरजेचे आहे. वास्तूची दुर्दशा होण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, मेळावे, प्रदर्शन, नाट्य-नृत्यांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांना दिल्यास वास्तूची देखभाल तर होईलच; पण उत्पन्नदेखील मिळणार आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढाकार घेऊन वस्त्रोद्योग महामंडळासोबत चर्चा करणे गरजेेचे आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त का असेना २० वर्षे बंद असलेल्या शाहू मिलचे दरवाजे पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुले झाले. वाढलेले गवत, जाळीजळमटे, धुळीच्या साम्राज्यात घुसमटलेल्या या सुंदर देखण्या वास्तूचा श्वास पुन्हा मोकळा झाला. २७ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या दगडी बांधकामाच्या वास्तूंना नवी झळाळी आली. वास्तू पाहण्यासाठी येत असलेल्या नागरिक-पर्यटकांची गर्दी महिना झाला तरी ओसरलेली नाही. ही वास्तू वर्षभर वापरात राहावी, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे.
उत्पन्नाचे स्रोत
दालने भाड्याने दिल्यास उत्पन्न सुरू होणार आहे. आठवडी बाजार, फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, व्यावसायिक प्रदर्शने , विक्रीचे स्टॉल्स अशा वेगवेगळ्या व्यावसायिक घटकांना ठरावीक रक्कम आकारून इथे व्यवसायाची परवानगी देता येईल. आराखडा होईल तेव्हा होईल, तोपर्यंत वास्तूची देखभाल व उत्पन्न तरी मिळेल.
नवा पर्याय...
कोल्हापुरात सध्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह सोडले तर शहराच्या मध्यवर्ती परिसरात एकही मोठे सभागृह नाही, त्याचीही क्षमता ७०० तर शाहू स्मारकची क्षमता ३०० प्रेक्षकांची आहे. हे दोन्ही हॉल नेहमी बुक असतात, विशेषत: शनिवार आणि रविवारी. त्यामुळे इच्छा असूनही ठरलेल्या दिवशी व्यक्ती व संस्थांना येथे कार्यक्रम घेता येत नाही. मोठे कार्यक्रम घ्यायचे असतील तर थेट मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन गाठावे लागते. अशा परिस्थितीत शाहू मिलमधील सगळेच हॉल उत्तम पर्याय आहेत. एकाचवेळी इथे किमान चार कार्यक्रम होऊ शकतात.
आराखडा होईपर्यंत काय करणार..?
ही वास्तू वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. ती कोल्हापूर महापालिकेला हस्तांतरीत करावी लागेल, त्यानंतर पुढील कार्यवाही होईल. आराखडा बनवून पाच-सात वर्षे झाली, आता अनेक नव्या आधुनिक सूचना व संकल्पना सुचवण्यात आल्या आहेत. त्यांचा समावेश करून परिपूर्ण आराखडा बनवायला, तो शासन दरबारी सादर होऊन मंजुरी मिळायला, निधी यायला आणि प्रत्यक्ष काम सुरू व्हायला किती वर्षे लागतील, हे सांगणे अवघड आहे. तोपर्यंत वास्तू पुन्हा धूळ खात राहणार, त्यापेक्षा वापरात ठेवली तर सुस्थितीत राहील.
हे आहेत पर्याय
- वास्तू वापरात आणण्यासाठी लाईट, पाणी आणि स्वच्छतागृहाची सोय व्हावी .
- वस्त्रोद्योग महामंडळानेच भाडेतत्त्वावर चालवावी.
- महामंडळाला शक्य नसेल तर तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूर महापालिकेला चालवायला द्यावी.
- निविदा प्रसिद्ध करून खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागवता येतील.