Kolhapur: देवस्थानमधील भ्रष्ट कारभाराची चौकशी कधी?, उद्धवसेनेने विचारला जाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:38 IST2024-12-12T16:37:45+5:302024-12-12T16:38:45+5:30
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये २०१७ ते २०१९ काळात नोकर भरतीसह विविध प्रकरणांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ...

Kolhapur: देवस्थानमधील भ्रष्ट कारभाराची चौकशी कधी?, उद्धवसेनेने विचारला जाब
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये २०१७ ते २०१९ काळात नोकर भरतीसह विविध प्रकरणांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या संदर्भात चौकशी व्हावी यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता त्याचे पुढे काय झाले असा जाब विचारत बुधवारी उद्धवसेनेने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, समितीचे नुकसान वसूल करावे अशी मागणी केली. असे न झाल्यास आम्हाला विविध मार्गाने लढा उभा करावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिले. तत्कालीन उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी नोकर भरतीबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल केला होता. शासनाची मान्यता नसलेल्या कोणत्याही पदावर समितीला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येत नाही. तरीदेखील विविध २१ पदे भरलेली आहेत. ही पदे भरताना कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही.
ही नोकर भरती बेकायदेशीरपणे करण्यात आली. शासनाने मान्यता न दिलेल्या पदांवरील नियुक्ती आदेश तत्काळ रद्द करावे अशी मागणी यात करण्यात आली. यावेळी शशिकांत बिडकर, अवधूत साळोखे, गोविंदा वाघमारे, चंदू भोसले, दीपक गौड, दिनेश परमार, मंजीत माने, अभी दाभाडे, स्मिता सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.