आणूर-बस्तवडे पूल वाहतुकीसाठी सज्ज कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:48 AM2020-12-17T04:48:16+5:302020-12-17T04:48:16+5:30
म्हाकवे : कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अंतिम टप्प्यात आलेल्या बस्तवडे-आणूरदरम्यान पुलाचे काम वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे अत्यंत धोकादायक असलेल्या ...
म्हाकवे : कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अंतिम टप्प्यात आलेल्या बस्तवडे-आणूरदरम्यान पुलाचे काम वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे अत्यंत धोकादायक असलेल्या बंधाऱ्यावरूनच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे किमान येत्या पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी सज्ज होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. या पुलासाठी सुमारे १० कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये या परिसरातील आणि विशेषतः पावसाळ्यात होणारी वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन या पुलाचे काम सुरू केले. अत्याधुनिक यंत्रणा असल्यामुळे दीड-दोन वर्षांत हा पूल पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांना भरपाई, भराव टाकण्यावरून काही काळ काम थांबविले होते. त्यामुळे विलंब होत गेला.
गतवर्षी हा पूल उभारून दोन्ही बाजूंला नळे टाकून भरावाचेही काम काही प्रमाणात झाले आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या या पुलाला येत्या पावसाळ्यापर्यंत उद्घाटनाचा मुहूर्त सापडणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु, संपर्क झाला नाही.
आणूर-बस्तवडेदरम्यान वेदगंगा नदीवरील रखडलेला पूल व बांधकामावर उगवलेले गवत.
(छाया : दत्तात्रय पाटील, म्हाकवे)