भोगावती नदीचे भोग संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:45+5:302021-08-14T04:29:45+5:30

राजेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क भोगावती : राधानगरी, करवीरसह अनेक भागांची तहान भागविणाऱ्या नद्यांमध्ये भोगावती नदीचाही मोलाचा वाटा आहे. ...

When will the Bhogawati river end? | भोगावती नदीचे भोग संपणार कधी?

भोगावती नदीचे भोग संपणार कधी?

Next

राजेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

भोगावती : राधानगरी, करवीरसह अनेक भागांची तहान भागविणाऱ्या नद्यांमध्ये भोगावती नदीचाही मोलाचा वाटा आहे. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांत वाढते अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे या नैसर्गिक स्रोताला बाधा पोहोचली आहे. नदी अरुंद होऊन हाहाकार माजविण्यास या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. भोगावतीच्या वाट्याला आलेले हे भोग संपणार कधी? या प्रश्नाचे उत्तर कोणी देईल, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोल्हापूरच्या नैर्ऋत्येस सुमारे ४८ कि.मी. अंतरावरील फोंडाघाटाच्या बाजूला उगवादेवीच्या डोंगराळ आणि दाट जंगलाने व्याप्त असलेल्या भागातून भोगावती नदीचा प्रवाह सुरू होतो. अनेक वळणे घेत या नदीचा आणि तुळशी नदीचा महे येथे संगम होतो, पुढे प्रयाग चिखली येथे त्यांचा पंचगंगेत समावेश होतो. भोगावती नदीने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी आदी क्षेत्रांत क्रांती घडवून आणली. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे या नदीच्या प्रवाहात अनेक अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी नदीच्या पात्रात घुसून पाण्यात जिवंत राहणारी बच्चाची झाडे लावत आहेत. नदीकाठावरील उन्मळून पडणारी झाडांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे जमिनीशी संपर्क आल्यानंतर या झाडांना पालवी फुटून ती अस्ताव्यस्त पसरली जातात, तसेच नदीकाठावर पाण्याच्या मोटर असून, बऱ्याच शेतकऱ्यांनी मोटरीचे फौंडेशन ‌घट्ट रहावे म्हणून बांधकामे केली आहेत. त्याचबरोबर प्रवाहाच्या ८२ कि.मी. अंतराच्या नदीकाठावरील अनेक गावांमधील सांडपाणी थेट नदीत मिसळते, तसेच अन्य कचराही थेट नदीत टाकला जातो. या सर्वांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याची शासनाच्या संबंधित विभागाने वेळीच दखल न घेतल्यास त्याचे भविष्यकाळात गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष का?

नदीच्या पाण्याचा सार्वजनिक वापर करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शासनाचा पाटबंधारे विभाग नियमित पाणीपट्टी वसूल करतो. असे असताना नैसर्गिक स्रोताला पोहोचत असलेल्या हानीकडे हा विभाग दुर्लक्ष का करीत आहे. जबाबदार घटकांवर कारवाई का होत नाही? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.

(या बातमीला प्रतिक्रया देणार आहेत...)

फोटो ओळी : भोगावती नदीपात्रात कोसळलेल्या वृक्षामुळे नदीने आपली दिशा बदललेली दिसत आहे.

Web Title: When will the Bhogawati river end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.