जिल्हा बँकेतील अपहाराची वसुली कधी होणार?
By admin | Published: September 29, 2016 12:18 AM2016-09-29T00:18:33+5:302016-09-29T00:32:54+5:30
२८ जणांवर जबाबदारी : कागल, गोकुळ शिरगाव, निगवे शाखांमधील कर्मचाऱ्यांकडून तीन कोटी ४६ लाखांचा अपहार
प्रकाश पाटील -- कोपार्डे
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बॅँकेमधून जिल्ह्याच्या औद्योगिक व कृषी विकासाला चालना मिळाली आहे. बॅँकेवरील विश्वासाने या बॅँकेच्या ठेवीत दरवर्षी कोट्यवधींची वाढ होते. सर्वसामान्य लोकांच्या पुंजीला संरक्षण देणे हे बॅँकेच्या कारभाराचे काम असते; पण कर्मचाऱ्यांकडून बॅँकेतील रकमेवर डल्ला मारत अपहार करणाऱ्यांना संरक्षण दिल्याचेच स्पष्ट झाले असून, अहवालात जिल्हा बॅँकेच्या तीन शाखांत झालेल्या तीन कोटी ४६ लाख रुपयांची वसुलीच झालेली नाही, हे स्पष्ट झाले आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्हा बॅँकेच्या कागल, गोकुळ शिरगाव व निगवे या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांकडून अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. कागल येथील दोन शाखांमध्ये दोन कोटी ८७ लाख, गोकुळ शिरगाव येथील शाखेत ६९ लाख, तर निगवे येथील शाखेत ४५ लाख रुपयांचा अपहार कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या अपहारप्रकरणी कार्यकारी संचालक दीपक चव्हाण यांच्यासह २८ कर्मचाऱ्यांवर रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात आली
होती.
यात कागल शाखा - १ मधील कॅशिअर ए. बी. पुणेकर यांच्यावर एक कोटी ५० लाख, तर कागल शाखा-२ मधील कॅशिअर आर. एन. भुजवडकर यांच्यावर एक कोटी ५० लाख, अशी तीन लाखांची अपहारातील रकमेची जबाबदारी निश्चित केली होती. इतर कर्मचाऱ्यांकडून वसूल करावे, असा चौकशी समितीने ठपका ठेवला होता. यात कागल शाखा - २ चे कॅशिअर बी. जी. केर्ले, आर. बी. पिष्टे (लिपिक), आर. एस. करबळी (लिपिक), वाय. बी. कुंभार (लिपिक), कागल शाखा-२ चे शाखाधिकारी पी. आर. चौगले, शाहू बंडू आवळे, बी. एस. चौगले (रिसिव्हिंग कॅशिअर), बी. बी. पाटील (उपव्यवस्थापक), ए. डी. घोरपडे (उपव्यवस्थापक), आर. एल. रसाळ (उपव्यवस्थापक), एस. एस. इंदुलकर (अकौंटंट), एस. ए. जोशी (अकौंटंट), राहुल माने (लिपिक), एस. डी. माने (सब अकौंटंट), ए. ए. खोत (शाखा तपासणी अधिकारी), ए. डी. यळगावकर (मुख्य कॅशिअर), बी. जी. कल्याणकर (चीफ अकौंटंट), आर. जी. ठाणेकर (चीफ अकौंटंट), एस. व्ही. मुनीश्वर (चीफ अकौंटंट), दीपक चव्हाण (मॅनेजिंग अकौंटंट), बी. बी. बेडगे (लिपिक), एन. आय. पिरजादे (लिपिक), ए. आय. माळी या सर्व २३ जणांवर प्रत्येकी एक लाख ७७ हजार, तर गोकुळ शिरगाव शाखेतील शाखाधिकारी आर. व्ही. जाधव व एस. ए. केसरकर यांच्यावर प्रत्येकी ३९ लाख ८७ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित करून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र, प्रशासकांच्या काळानंतर आलेल्या संचालक मंडळानेही या शाखांमधील वरील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अपहार रकमेच्या वसुलीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र अहवालातील आकडेवारीतून दिसत आहे. वरील रकमेतील तीन कोटी ४६ लाख रुपये आजही वसूलपात्र असल्याची आकडेवारी आल्याने सर्वसामान्य माणसांमध्ये चिंतेची पाल चुकचुकते आहे.
वसुलीला गती मिळायला हवी
जिल्हा बॅँकेच्या संपूर्ण जिल्ह्यातील १९२ शाखांमध्ये आठ लाख खातेदार आहेत. यांच्यामध्ये आपल्या ठेवी बचत खाते कर्जाच्या रकमा यांच्या संरक्षणाबाबत विश्वास निर्माण करावयाचा असेल, तर या अपहारातील रकमेच्या वसुलीला गती मिळायला हवी. अन्यथा, बॅँकेचे अध्यक्ष असणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या तालुक्यातील शाखांमध्येच मोठा अपहार कर्मचाऱ्यांनी केल्याने खुद्द अध्यक्षांचे याला संरक्षण आहे, अशी शंका बळावल्याशिवाय राहणार नाही.
शाखांनिहाय अपहाराची रक्कम
२, ८७,00,000
कागल
६९,00,000
गोकुळ शिरगाव
४५,00,000
निगवे