जिल्हा पर्यटन समितीला मुहूर्त मिळणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:59 AM2017-10-09T00:59:48+5:302017-10-09T00:59:48+5:30
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी एकीकडे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अथक प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजूनही शासकीय, अशासकीय सदस्यांची कोल्हापूर जिल्हा पर्यटन समिती अस्तित्वातच आलेली नाही. शासन, प्रशासन आणि या क्षेत्रांशी संबंधितांचा एकाच दिशेने प्रवास सुरू होण्यासाठी ही समिती आवश्यक आहे.
दि. ५ आॅक्टोबरपासून दि. २५ आॅक्टोबरपर्यंत देशभरात ‘पर्यटन पर्व’ राबविण्यात येत आहे. कोल्हापुरातही विविध उपक्रमांनी ‘पर्यटन पर्व’ साजरे करण्यात येणार आहे. दिवाळीपासून ते पुढील मे महिन्यापर्यंतच्या पर्यटनाला पूरक वातावरण तयार करण्यासाठी हे ‘पर्यटन पर्व’ राबविण्यात येणार असून त्यासाठी विविध उपक्रम, चर्चा, परिसंवाद यासारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने वर्षापूर्वी राज्यातील सर्व टूर्स आॅपरेटर्सना तीन दिवसांसाठी कोल्हापुरात पाचारण करण्यात आले होते. कोल्हापूर हॉटेल मालक संघाने याचे नियोजन केले होते. यावेळी राज्य टूर्स आॅपरेटर्स संघाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपला सविस्तर अहवाल प्रशासनाला दिला होता. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक पर्यटन मंडळ स्थापन करावे, अशी त्यात महत्त्वाची सूचना होती. मात्र, वर्ष झाले तरी याची अंमलबजावणी झालेली नाही.
अनेकवेळा खासदार, आमदार आणि प्रशासनातील अधिकारी यांची समिती तयार होते व त्यानुसार त्यांचा अजेंडा राबविला जातो. ‘पर्यटना’च्या नावाखाली केवळ मतदारसंघातील देवळांच्या समोर सभामंडप घालण्यासाठीही निधी वापरला जातो. मात्र, खरोखरच पर्यटनवाढीसाठी हॉटेल मालक, टूर्स आॅपरेटर्स, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, पर्यटन अभ्यासक, आदींच्या समावेशाची व्यापक समिती स्थापन करण्याची गरज आहे. प्रत्यक्ष काम करणाºया कार्यकर्त्यांनाही समितीवर घेण्याची गरज आहे. ही समिती लवकरात लवकर स्थापन करून पर्यटन विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची दिशा एकच ठेवण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत.
ट्रान्स्पोर्ट आॅपरेटर्सना आज मार्गदर्शन
कोणत्याही शहरात ट्रान्स्पोर्ट आॅपरेटर आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्याकडे पर्यटक पहिल्यांदा चौकशी करत असतात. त्याच ठिकाणी त्यांना सन्मानाची वागणूक आणि विश्वासार्हतेची खात्री झाली की मग त्या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच तयार होतो. त्याचे महत्त्व जाणून आज दुपारी साडेचार ते साडेसात या वेळेत ट्रान्स्पोर्ट आॅपरेटर आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यासाठी हॉटेल पॅव्हेलियन येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी पर्यटन महामंडळाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.