पूरग्रस्तांना नुकसानभरपाई कधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:45+5:302021-08-28T04:28:45+5:30
प्रयाग चिखली : महापुराने नुकसान झालेल्या शेती, घरांचे सरकारने पंचनामे केले खरे मात्र, महिना उलटला तरी अद्याप नुकसानभरपाई मिळाली ...
प्रयाग चिखली : महापुराने नुकसान झालेल्या शेती, घरांचे सरकारने पंचनामे केले खरे मात्र, महिना उलटला तरी अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने वरणगे (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गत महिन्यात आलेल्या महापुरात वरणगे गावातील लोकांचे मोठे नुकसान झाले. पिकाऊ शेती पाण्याखाली गेल्याने उस शेतीला फटका बसला. शिवाय घरांमध्येही पाणी गेल्याने शेकडो लोकांना स्थलांतर करावे लागले. घरांचे, घरातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाच्यावतीने पूरबाधित घरांचा पंचनामा करून यादीही प्रसिद्ध केली. पण, अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे करवीर तालुका कार्याध्यक्ष राहुल पाटील यांनी केली.