भविष्याचे ‘गेट’ कधी उघडणार ?
By Admin | Published: May 19, 2016 12:06 AM2016-05-19T00:06:50+5:302016-05-19T00:43:20+5:30
राजेंद्रनगर येथील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे,
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील पॅरामाऊंट या कंपनीत भट्टीत स्फोट झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका २८ वर्षीय कामगाराचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह कंपनीत नेल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र कंपनी व्यवस्थापनाने मयत कामगाराच्या कुटुंबियांस आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिल्याने व पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तणाव निवळला.
पॅरामाऊंट (प्लॉट क्रमांक-के.-१२) या कंपनीत दुचाकीसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टवर कोटिंग करण्याचे काम करण्यात येते. कैलास नारायण भावले (२८, रा. अंबेलोहळ, ता. गंगापूर) हा तेथे मशीन आॅपेरटर होता. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भट्टीचा अचानक स्फोट झाल्यामुळे कैलास गंभीर जखमी झाला.
स्फोटामुळे या भट्टीचा दरवाजा डोक्याला लागल्यामुळे कैलास बेशुद्ध पडला. कामगार ज्ञानेश्वर सपकाळ व सुरक्षारक्षकांनी कैलासला शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सायंकाळी कैलासची प्राणज्योत मालवली. स्फोटात ज्ञानेश्वर सपकाळ व अन्य एक कामगारही किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ. चंद्रभान गवांदे करीत आहेत.
मृतदेह घेऊन नातेवाईक कंपनीत
कैलासचे बुधवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला. मृत्यूस कंपनी व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करून संतप्त नातेवाईकांनी मृतदेह दुपारी १ वाजेच्या सुमारास कंपनीत नेला. इतर कामगार व नातेवाईक मोठ्या संख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जमा झाल्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात, पोहेकॉ. सी.ए.गवांदे, पोहेकॉ.रामदास गाडेकर, पोकॉ.बाळासाहेब आंधळे यांनी कंपनीत जाऊन संतप्त नातेवाईकांची समजूत काढून कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा घडवून आणली.
अपघातामुळे ही घटना घडली असून तुमची तक्रार असल्यास कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करू, असे पोलीस निरीक्षक थोरात यांनी नातेवाईकांना सांगितल्यामुळे त्यांचा विरोधातील सूर मावळला. मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत करण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आले. त्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी नरमाईची भूमिका घेत शव अंबेलोहळला नेले. कैलासच्या पार्थिवावर दुपारी अंबेलोहळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर
कैलासची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून कंपनीत काम करून तो कुटुंबियांची उपजीविका भागवीत होता. कैलास हा एक वर्षाचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याच्या आईने मिळेल ते काम करून कैलासचे संगोपन केले होते.
कैलासच्या मागे पत्नी व एक मुलगा असून त्याची आई हाड मोडल्यामुळे अंथरुणावर पडून आहे. घरातील एकमेव कर्ता पुरुष मरण पावल्यामुळे कैलासच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पत्नी, आई व मुलगा उघड्यावर आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.